रेल्वे इंजिनिअर्स संघटना स्थापनेच्या तयारीत
By Admin | Updated: April 7, 2016 00:09 IST2016-04-07T00:09:27+5:302016-04-07T00:09:27+5:30
रेल्वे प्रशासनात कार्यरत अभियंत्यांनी विविध मागण्यांसाठी ६ एप्रिल रोजी बडनेरा रेल्वेस्थानकावर धरणे आंदोलन केले.

रेल्वे इंजिनिअर्स संघटना स्थापनेच्या तयारीत
विविध मागण्या : बडनेरा स्थानकासह देशभर धरणे
बडनेरा : रेल्वे प्रशासनात कार्यरत अभियंत्यांनी विविध मागण्यांसाठी ६ एप्रिल रोजी बडनेरा रेल्वेस्थानकावर धरणे आंदोलन केले. हे आंदोलन बुधवारी देशभर करण्यात आले. विविध मागण्यांकडे रेल्वे मंत्रालयाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
रेल्वे प्रशासनात कार्यरत अभियंता, कनिष्ठ अभियंत्यांना तांत्रिक कामाकाजातील अतिरिक्त भत्ता देण्यात यावा, इतरही कामातील भत्ते अभियंत्यांना मिळत नाही. जीवावर बेतणारे काम हे अभियंता व त्यांचे सहाय्यक करीत असतात. इंजिनिअर्स एसोसिएशन तयार करण्यासाठी मान्यता मिळावी. संघटनेच्या माध्यमातून अडी अडचणी रेल्वे मंत्रालयापर्यंत पोहोचवता याव्यात तसेच राजपत्रित दर्जा मिळावा. वरिष्ठांकडून आम्हाला अपमानास्पद वागणूक मिळते. त्यामुळे आमच्यातील मनोधैर्य खचून त्याचा कामकाजावर परिणाम होऊ शकतो. यासाठी वरिष्ठांनी अपमानास्पद वागणूक देऊ नये. यासह इतरही मागण्यांसाठी बडनेरा रेल्वे स्थानकावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बडनेरा व अमरावती रेल्वे विभागात कार्यरत अभियंता व कनिष्ठ अभियंते प्रामुख्याने उपस्थित होते.