रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठ स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 22:22 IST2018-03-04T22:22:37+5:302018-03-04T22:22:49+5:30

राज्य शासनाने मराठी विद्यापीठ मुंबई येथे प्रस्तावित केले आहे. परंतु, मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर येथे मराठीतील दोन्ही आद्य ग्रंथांचे लेखन झाले असल्याने याच ठिकाणी मराठी विद्यापीठ स्थापन करावे, ....

Establish Marathi University at Riddhapur | रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठ स्थापन करा

रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठ स्थापन करा

ठळक मुद्देमागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आॅनलाईन लोकमत
अमरावती : राज्य शासनाने मराठी विद्यापीठ मुंबई येथे प्रस्तावित केले आहे. परंतु, मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर येथे मराठीतील दोन्ही आद्य ग्रंथांचे लेखन झाले असल्याने याच ठिकाणी मराठी विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी खा. आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वात जि.प. उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना शनिवारी निवेदनाद्वारा केली.
मराठीमधील आद्य गद्य ग्रंथ ‘लीळाचरित्र’ तसेच आद्य पद्य ग्रंथ ‘महदंबेचे धवळे’ यांचे लेखन रिद्धपूर येथे झाले. आद्य संशोधक, चरित्रकार माहिमभट्ट यांनी येथेच ‘वाजेश्वरी’ या स्थानावर शके १२०० मध्ये लीळाचरित्राची निर्मिती केली. या गं्रथामुळेच मराठीची ओळख झाली. ही मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे. येथेच महानुभावीय संतांनी लिखाण केले आहे. येथेच हजारोंच्या संख्येत हस्तलिखिते पूर्वजांचा वारसा म्हणून जतन केली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही भेटीदरम्यान मराठी विद्यापीठ रिद्धपूर येथेच होण्यास सहमती दर्शविली. मात्र, आता मराठी विद्यापीठ मुंबई येथे नेण्याचा घाट रचला जात आहे. हा महानुभावीय वाङ्मयावर व मराठी भाषिकांवर अन्यायकारक निर्णय असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी झेडपी उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांनी केली. यावेळी जि.प.अध्यक्ष नितीन गोंडाणे उपस्थित होते.

महानुभाव पंथीयांची काशी म्हणून रिद्धपूर हे गाव देशभर ओळखले जाते. या गावाचे महत्त्व लक्षात घेऊन व भाविकांच्या भावनांचा आदर करण्यासाठी रिद्धपूर येथेच मराठी विद्यापीठाची स्थापना शासनाने करणे आवश्यक आहे.
- दत्ता ढोमणे,
उपाध्यक्ष, जिल्हा परिषद

Web Title: Establish Marathi University at Riddhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.