अंध विद्यार्थ्यांसाठी डिजिटल लायब्ररीची स्थापना करणार
By Admin | Updated: June 27, 2016 00:02 IST2016-06-27T00:02:33+5:302016-06-27T00:02:33+5:30
येत्या वर्षभरात अंध विद्यार्थ्यांसाठी अमरावतीत डिजिटल लायब्ररीची स्थापना केली जाईल.

अंध विद्यार्थ्यांसाठी डिजिटल लायब्ररीची स्थापना करणार
गुणवंताचा गौरव : प्रवीण पोटे यांचे प्रतिपादन
अमरावती : येत्या वर्षभरात अंध विद्यार्थ्यांसाठी अमरावतीत डिजिटल लायब्ररीची स्थापना केली जाईल. या लायब्ररीत अंधांच्या शिक्षणासाठी उपयोगी साहित्य, ब्रेल लिपिशी सुसंगत आवश्यक बाबी पुरविल्या जातील, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.
सामाजिक न्याय दिनानिमित्त येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात आयोजित समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर आ. अनिल बोंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद संजय इंगळे, समाज कल्याण विभाग प्रादेशिक उपायुक्त दीपक वडकुते, जिल्हा समाजकल्याण अधिकारी भा.रा. चव्हाण, समाज कल्याणच्या सहायक आयुक्त प्राजक्ता इंगळे, उत्तमराव भैसने, सुरेश स्वर्गे आदी उपस्थित होते. यावेळी सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून अनुसूचित जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांनी समाजहितासाठी यूपीएससी परीक्षांकडे वळले पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त केलेल्या तरतुदीतून गोरगरीब व वंचितांसाठी काम केले पाहिजे, त्यासाठी अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. मागासवर्गीय गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना पाच हजार रूपये, मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये मीनाक्षी अजनेरिया, अश्विनी भोयर, अमिषा तायडे, हर्ष ढोणे, अंजली कांबळे, विशाल बनसोड, वैशाली वानखडे, निकिता तायडे, पल्लवी सोमकुंवर, अजय तायडे, रविना इंगळे, ऋत्विक शेंडे, रोहिणी आठवले, वैभव तसरे, मयुरी कांबळे, विवेक मोरे यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)