डेपो परिसरात अतिक्रमण निर्मूलन
By Admin | Updated: December 11, 2015 00:42 IST2015-12-11T00:42:30+5:302015-12-11T00:42:30+5:30
अतिक्रमणाच्या विळख्यातून परतवाडा आगाराची सुटका होण्यासाठी प्रशासनातर्फे धडक मोहीम तीन-चार दिवसांपासून सुरू आहे.

डेपो परिसरात अतिक्रमण निर्मूलन
अचलपूर : अतिक्रमणाच्या विळख्यातून परतवाडा आगाराची सुटका होण्यासाठी प्रशासनातर्फे धडक मोहीम तीन-चार दिवसांपासून सुरू आहे. परंतु अतिक्रमणधारक किरकोळ व्यावसायिकांना पर्यायी जागेची व्यवस्था करून न दिल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण, आगाराच्या जवळच्या रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या खासगी वाहनांकडे आगार व्यवस्थापकांचे दुर्लक्ष आहे. शहरातील सर्वच रस्त्यांनी मोकळा श्वास घ्यावा, यासाठी आता व्यापारी वर्गच पुढे सरसावला आहे.
परतवाडा बसस्थानकावरून बाहेरगावी जाणाऱ्या बसची संख्या मोठी असल्याने उत्पन्नही बऱ्याच प्रमाणात आहे. या आगाराभोवती पानटपऱ्या, हॉटेल, उपहारगृहे, कपड्यांची दुकाने, चप्पल दुकान, पार्लर आदी अतिक्रमित दुकानांनी विळखा घातला होता. हा विळखा १० ते १५ वर्षांपासून आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथील राज्यमहामार्गही त्यामुळे अरूंद झाला आहे. या रस्त्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ते जयस्तंभपर्यंत दुभाजीकरण करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरुवात झाली आहे. हे काम निम्म्यापेक्षा जास्त पूर्ण झाले आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होणार असली तरी अतिक्रमणाची मोठी समस्या आहेच. गेल्या दोन-तीन दिवसांपासून प्रशासनाने अतिक्रमण हटाओ मोहीम सुरू केली आहे. व्यावसायिकांची दुकाने हटवली असली तरी काहींनी आपल्या त्याच जागेवर लोटगाडी लावून व्यवसाय सुरू ठेवल्याचे दिसत आहे.
शहरातील अतिक्रमणाचे काय ?
परतवाडा बस डेपो परिसर अतिक्रमणमुक्त करण्याचा प्रयत्न प्रशासनाने चालविला आहे. अचलपूर-परतवाडा शहरात दोन-चार वर्षांतून एखादवेळी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येऊन नंतर थंडावते. उलट त्यात अजून अतिक्रमित दुकानांची भर पडते. याकडे नगरपालिकेचे पदाधिकारी लक्षही देत नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला रस्त्यावरून चालणेही कठीण होते.
परतवाड्यातील दुराणी चौक, जयस्तंभ, टिळक चौक, मिश्रा चौक, गुजरी, सदर बाजार, लाकूडबाजार परिसर तर अचलपुरातील चावलमंडी, बुद्धेखा चौक, देवडी, गांधीपूल, दुल्हा गेट, खिडकी गेट, उपजिल्हा रुग्णालय परिसर आदी भाग मागील २० ते २५ वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. नगरपालिकेने याबाबत झोपेचे सोंग घेतले आहे. विद्यमान नगरसेवक माजी झाल्यावर तो शहराच्या विकासाच्या गप्पा मारताना दिसतो. हे चित्र गेल्या कित्येक वर्षांपासूनचे आहे. त्यामुळे लोकांचा नगरसेवकांवर विश्वास राहिलेला नसल्याचे चर्चा जोर धरू लागली आहे.
शहरातील बहुतांशी दुकानांना पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहनेही रस्त्यावर उभी केली जातात. वास्तविक रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्त्यांना मोकळा श्वास मिळावा, यासाठी बहुतांश व्यापाऱ्यांची मनोमन इच्छा आहे. अचलपुरात तर जे व्यापारी नवीन प्रतिष्ठान बांधतात ते रस्त्यापासून ६ ते ७ फूट जागा सोडून बांधत आहेत. व्यापारी स्वत: अतिक्रमण हटविण्याच्या मानसिकतेत आहे. पण नगरपालिकेचे पदाधिकारीच याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहेत. (शहर प्रतिनिधी)
अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष
बस आगाराच्या २०० मीटरच्या आत खासगी वाहने उभी करू नयेत, असा नियम असला तरी जवळच्या कालीपिली, खासगी बस, आॅटो बिनधास्त उभ्या राहतात. हे लोक कित्येक वेळा आगार परिसरात येऊन प्रवासी पळवून नेतात. पण आगार व्यवस्थापक यावर काहीच कारवाई करताना दिसत नाही. अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली असली तरी त्यांचा फटका सदर वाहनांना बसलेला दिसत नाही. आगारापासून २०० मीटरच्या आत खासगी प्रवासी वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई कोण करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या मोहिमेमुळे ५० पेक्षा अधिक लोक बेरोजगार झाले असून त्यांना व्यवसायासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.
पोलीस ठाण्यात धडक
नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी होऊनही कारवाई होत नसल्याने परतवाड्यातील व्यापारी अशोक जितवाणी, प्रताप खटवाणी, कालू जयसिंगानी, अजय जयस्वाल, राजेंद्र जैन, गुरूमुखदास टहलवानी, दीपक मुलचंदाणी, सेवकराव चंदनानी, देवीदास जयसिंघानी आदी व्यापाऱ्यांनी अतिक्रमणाबाबत योग्य कारवाई करावी, असे निवेदन पोलीस स्टेशनमध्ये दिले आहे.