चांदूर रेल्वेत १९७ गणेशमूर्तींंचे पर्यावरणपूरक विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:14 IST2021-09-21T04:14:02+5:302021-09-21T04:14:02+5:30
पर्यावरण रक्षणासाठी कृत्रिम तलाव, गणेश विसर्जनासाठी नगर परिषदेचा उपक्रम फोटो - चांदूर रेल्वे २० पी चांदूर (रेल्वे) : शहरात ...

चांदूर रेल्वेत १९७ गणेशमूर्तींंचे पर्यावरणपूरक विसर्जन
पर्यावरण रक्षणासाठी कृत्रिम तलाव, गणेश विसर्जनासाठी नगर परिषदेचा उपक्रम
फोटो - चांदूर रेल्वे २० पी
चांदूर (रेल्वे) : शहरात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती नगर परिषदेकडून करण्यात आली. यात रविवारी दिवसभरात १९७ घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मूर्ती विसर्जित करणाऱ्यांसाठी लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला आहे.
गणेश स्थापनेनंतर दहा दिवस विधिवत पूजाअर्चा करून अनंत चतुर्दशीला बाप्पाचे विसर्जन मोठ्या धूमधडाक्याने केले जाते. यावर्षी भरपूर पाऊस झाल्याने नदी, तलाव तुडुंब भरले आहेत. त्यामुळे बाप्पांचे विसर्जन करतांना तलाव किंवा नदीत भक्त वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. असा अनुचित प्रकार घडू नये म्हणून नगर परिषदेने स्थानिक रामनगरमध्ये मंडप टाकून कृत्रिम तलावात विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली. निर्माल्यासाठी मंगल कलश ठेवलेला आहे.
प्लास्टिक, थर्मोकॉलमुक्त शहर, ध्वनिप्रदूषणमुक्त स्वच्छ, सुंदर शहरासाठी नगर परिषदेने हा उपक्रम राबविला. आपापल्या घरातील गणेशमूर्तीचे विसर्जन इतरत्र न करता या कृत्रिम तलावाचा उपयोग करावा, जेणेकरून पर्यावरण रक्षण होईल, असे आवाहन करण्यात आले होते. या मंडपात मूर्ती विसर्जनाच्यासाठी येणाऱ्या लोकांचे नगर परिषद अध्यक्ष नीलेश सूर्यवंशी, मुख्याधिकारी मेघना वासनकर, आरोग्य सभापती महेश कलावटे, पाणीपुरवठा सभापती वैभव गायकवाड आणि नगर सेवकानी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कर्मचारी राहुल ईमले, बबलू ईमले, प्रकाश गिरी, बंडू वानखडे, जितू करसे आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. पोलीस निरीक्षक मगन मेहते यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दिवसभरात
--------------सध्या शहरात मातीच्या गणेशमूर्ती फार कमी प्रमाणात तयार करण्यात येतात. बहुतेक घरी स्थापित गणेशमूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बसवल्या जातात. या मूर्ती तलाव-नदी या ठिकाणी विसर्जित केल्यास जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. दूषित पाण्यामुळे लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली.
- नीलेश सूर्यवंशी, नगराध्यक्ष