पर्यावरण संतुलित योजनेचा फज्जा

By Admin | Updated: May 9, 2014 00:58 IST2014-05-09T00:58:41+5:302014-05-09T00:58:41+5:30

गावाच्या संपूर्ण विकासासाठी अनेकदा निधीची कमतरता भासते. यावर उपाय म्हणून पर्यावरण संतुलित ग्रामसमृध्दी योजनेतून संपूर्ण विकासासाठी भरघोस निधी टप्प्याटप्प्याने दिला जातो.

Environmental Balance Plan | पर्यावरण संतुलित योजनेचा फज्जा

पर्यावरण संतुलित योजनेचा फज्जा

समित हरकुट ■ चांदूरबाजार
गावाच्या संपूर्ण विकासासाठी अनेकदा निधीची कमतरता भासते. यावर उपाय म्हणून पर्यावरण संतुलित ग्रामसमृध्दी योजनेतून संपूर्ण विकासासाठी भरघोस निधी टप्प्याटप्प्याने दिला जातो. मात्र, यंत्रणेतील ग्रामपंचायतींच्या उदासीन धोरणामुळे या योजनेचे बारा वाजले आहेत.
तालुक्यात एकूण १७१ गावे असून २४ गावे उजाड आहेत. १४३ गावे आबाद आहेत. मात्र, पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेच्या तिसर्‍या वर्षी तालुक्यातील एकही गाव पात्र ठरले नाही, ही या तालुक्याची शोकांतिका आहे. तालुक्यात योजनेचा प्रारंभ २00९-१0 मध्ये झाला होता. या योजनेमध्ये पहिल्या वर्षी सहभागी होण्यासाठी गावाची ६0 टक्के करवसुली, गावात ६0 टक्के हागणदारीमुक्ती, लोकसंख्येच्या तुलनेत ५0 टक्के वृक्षलागवड, दुसर्‍या वर्षी ८0 टक्के करवसुली, ८0 टक्के शौचालयांचा वापर, लोकसंख्येच्या तुलनेत ७५ टक्के वृक्षलागवड व घनकचरा व्यवस्थापन तर तिसर्‍या वर्षी ९0 टक्के करवसुली, १00 टक्के शौचालयांचा वापर, १00 टक्के वृक्षलागवड व २ टक्के बायोगॅसचा वापर याप्रमाणे या गावांची योजनेंतर्गत निवड केली जाते.
पात्र गावांना तीनही वर्षी गावातील लोकसंख्येच्या तुलनेत बक्षिसे दिली जातात. या योजनेला प्रारंभ झाला त्यावर्षी म्हणजे २00९-१0 मध्ये तळवेल व वणी या गावांची निवड करण्यात आली होती. वर्ष २0१0-११ यावर्षीसुध्दा बेलोरा, बेसखेडा, बोरगाव मोहना, तुळजापूर गढी व निमखेड या गावांची निवड करण्यात आली होती. वर्ष २0११-१२ मध्येसुध्दा प्रथम वर्षाकरिताच आसेगाव, बेलज, कलडोही व रसुलापूर या गावांची निवड करण्यात आली होती.
तीनही वर्षांमध्ये प्रथम वर्षी एकूण ११ गावांची निवड करण्यात आली. मात्र, या गावांपैकी २ गावे दुसर्‍या वर्षासाठी पात्र ठरली. त्यामध्ये बेलोरा व निमखेडचा समावेश आहे. तर तिसर्‍या वर्षाकरिता एकही गाव योजनेसाठी पात्र ठरले नाही. चालू वर्षासाठी म्हणजे सन २0१३-१४ मध्ये सुध्दा पंचायत समितीने एकूण ९ गावे प्रस्तावित केलेली आहेत. यामध्ये विश्रोळी, सर्फापूर, खरवाडी, निंभोरा, राजुरा, सोनोरी, सर्फाबाद, रतनपूर, गोविंदपूर या गावांची पहिल्या वर्षाकरिता निवड करण्यात आली आहे. या गावांमधू द्वितीय व तृतीय वर्षामध्ये किती गावे पात्र ठरतात, याकडे तालुक्यांचे लक्ष लागले आहे.
योजनेतून गावातील विकास कामांसाठी तीन टप्प्यांमध्ये निधी दिला जातो. स्पर्धात्मक स्वरूपाची ही योजना आहे. प्रत्येक टप्प्यासाठी शासनाकडून निकष घालून देण्यात आले आहेत. या निकषांची पूर्तता केल्यास गावात भरघोस विकास निधी उपलब्ध होऊ शकतो. असे असतानाही तालुक्यातील ग्रामपंचायतींची उदासीनता डोळ्यात खुपणारी आहे. या योजनेचे महत्त्व ग्रामीण जनतेला पटवून देण्यात अद्यापपावेतो यंत्रणेला यश आलेले नाहीत.
पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद

Web Title: Environmental Balance Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.