उद्योजकांनी रोजगाराची संधी वाढवावी
By Admin | Updated: October 29, 2016 00:25 IST2016-10-29T00:25:32+5:302016-10-29T00:25:32+5:30
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात सोमवारी उद्योजकांची सभा पार पडली.

उद्योजकांनी रोजगाराची संधी वाढवावी
नितीन धांडे : विद्यापीठात उद्योजकांची सभा
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात सोमवारी उद्योजकांची सभा पार पडली. प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे उपस्थित होते. मार्गदर्शन करताना ते म्हणाले, कृषीक्षेत्रात विकासाच्या अनेक वाटा आहेत. कृषीवर आधारित जास्तीत जास्त उद्योग विकसित झाले पाहिजेत, अन्नदात्या शेतकऱ्याला पाहिजे तसा मोबदला मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करतो. शेती उत्पादनावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग सुरू होऊन शेतमालाला योग्य भाव कसा मिळेल, याचा विचार उद्योन्मुख उद्योजकांनी विशेषत: व्यावसायिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
व्यासपीठावर अध्यक्षस्थानी एमबीए विभागप्रमुख संतोष सदार, राजेश चांडक उपस्थित होते. तीन सत्रांतर्गत हा कार्यक्रम पार पडला. पहिल्या सत्रात कमलेश डागा, वीरेंद्र लढ्ढा, महेंद्र भुतडा, अशोक सोनी, दुसऱ्या सत्रात अनिकेत ठाकूर, हेमंत ठाकरे, परेश राजा, अविनाश कानतुटे तर तिसऱ्या सत्रात अरूण वरणगावकर, रणजित बंड, रवी पाटील यांनी उद्योजकांच्या समस्या व त्यांचे उद्योजक म्हणून असलेले अनुभव कथन केले.
अध्यक्षीय भाषण करताना विभागप्रमुख संतोष सदार म्हणाले, विद्यापीठाच्या एमबीए विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान व अनुभव देण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत असल्याने विद्यार्थ्यांना शंभर टक्के प्लेसमेंट मिळत आहे. विद्यापीठाचा एमबीए विभाग महाराष्ट्रात अग्रणी स्थान टिकून आहे. विद्यार्थ्यांचा विकास करण्यात सर्वच शिक्षकांचे सहकार्य लाभत आहे.