प्राथमिक शाळा सक्षम केल्यास गुणवत्तेत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2016 00:14 IST2016-05-18T00:14:26+5:302016-05-18T00:14:26+5:30
शासनाने प्राथमिक शाळांचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण केल्यास जि.प.च्या सर्व शाळांमधून दर्जेदार शिक्षणासह गुणवत्ता वाढीस लागेल, असा विश्वास ...

प्राथमिक शाळा सक्षम केल्यास गुणवत्तेत वाढ
विविधांगी चर्चा : प्राथमिक शिक्षक समिती कार्यकारिणीची बैठक
अमरावती : शासनाने प्राथमिक शाळांचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण केल्यास जि.प.च्या सर्व शाळांमधून दर्जेदार शिक्षणासह गुणवत्ता वाढीस लागेल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरस येथील प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात झाली. या बैठकीला राज्यभरातून ३०० हून अधिक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. शाळांची गुणवत्ता सुधारण्यााठी १:३० प्रमाणे शिक्षक द्यावेत, पुरेशा वर्गखोल्या पुरवाव्यात, पाणी व वीज मोफत हवी, गणवेश वितरणातील भेदभाव थांबवावा, त्याचप्रमाणे शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षणाच्या अनुषंगाने येणाऱ्या समस्यांच्या निराकरणासाठी संघटनांना अधिकाधिक वेळा न्यायालयाचे दार ठोठवावे लागते. त्यामुळे शासनाने संघटनांशी सुसंवाद साधून मार्ग काढावा, असे यावेळी बोरसे पाटील म्हणाले.
आरटीईची अंमलबजावणी करताना शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा घाट घातला आहे. मात्र या निर्णयाचा मोठा फटका मुलींच्या शिक्षणाला बसणार आहे. त्यामुळे या निर्णयाला शिक्षक समितीचा विरोध असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. इंग्रजीच्या काळात खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांचा कल थांबवावा, यासाठी पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व शाळांमधून सेमी इंग्रजीचे शिक्षण सुरू करावे, असे देखील या बैठकीत सांगण्यात आले. बैठकीला उपस्थित सदस्यांनी यावेळी त्यांचे विचार व्यक्त केलेत. बैठकीला लक्षणीय संख्येने उपस्थिती होती.