राज्यशास्त्राच्या विद्यार्थिनीला इंग्रजी विषयाची गुणपत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 06:00 IST2019-08-23T06:00:00+5:302019-08-23T06:00:57+5:30
राज्यशास्त्राच्या विद्यार्थिनीला चक्क इंग्रजी वाङ्मय या विषयाची गुणपत्रिका देण्यात आली. त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अचूक निकाल लावण्यात नापास झाल्याचे वास्तव समोर आले आहे. अल्केशा रवींद्र मडघे या विद्यार्थिनीने गुणपत्रिका दुरूस्तीसाठी विद्यापीठात धाव घेतली आहे.

राज्यशास्त्राच्या विद्यार्थिनीला इंग्रजी विषयाची गुणपत्रिका
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यशास्त्राच्या विद्यार्थिनीला चक्क इंग्रजी वाङ्मय या विषयाची गुणपत्रिका देण्यात आली. त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अचूक निकाल लावण्यात नापास झाल्याचे वास्तव समोर आले आहे. अल्केशा रवींद्र मडघे या विद्यार्थिनीने गुणपत्रिका दुरूस्तीसाठी विद्यापीठात धाव घेतली आहे.
विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यांकन संचालक हेमंत देशमुख यांना दिलेल्या पत्रानुसार, अंजनगाव सूर्जी येथील श्रीमती राधाबाई सारडा कॉलेज ऑफ आर्ट, कामर्स व सायन्स येथील बीए भाग २ ची विद्यार्थिनी अल्केशा रवींद्र मडघे हिने राज्यशास्त्र या विषयाचा पेपर दिला. मात्र, विद्यापीठाने बीए भाग २ सेमिस्टर ३ च्या गुणपत्रिकेत राज्यशास्त्राऐवजी इंग्रजी वाङ्मय या विषयाचे गुण अंकित करून गुणपत्रिका दिल्याचे पुढे आले आहे. या विद्यार्थिनीने न्यायासाठी गुरूवारी विद्यापीठात धाव घेतली असता, प्राचार्यांच्या स्वाक्षरीचे पत्र परीक्षा विभागाला देण्यात आले असून, अचूक गुणपत्रिका देण्याबाबतची विनंती करण्यात आली आहे.
यंदा विद्यापीठात निकालाबाबत गंभीर समस्या निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित वागणूक मिळत नसल्याची बहुतांश विद्यार्थ्यांची ओरड आहे. या महत्त्वाच्या बाबीकडे परीक्षा व मूल्यांकन अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
परीक्षा दिली तरीही गैरहजर
अंजनगाव सूर्जी येथील श्रीमती राधाबाई सारडा कॉलेज ऑफ आर्ट, कामर्स व सायन्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी रूपाली उल्हासराव अभ्यंकर हिला बी.ए. २ सेमिस्टर ३ (हिवाळी २०१८) मध्ये मराठी विषयात १८ गुण मिळाले होते. मात्र, विद्यापीठाने तयार केलेल्या पोर्टलवर तिचे नाव यादीत नसल्यामुळे गुणदान ‘क’ टेबलमध्ये भरण्यात आले नाही. त्यामुळे रूपाली या विद्यार्थिनीला गैरहजर दर्शविण्यात आले. तशीच गुणत्रिका तिला मिळाली आहे. या विद्यार्थिनीनेसुद्धा न्यायासाठी धाव घेतली आहे.