पाच हजार लोकसंख्येवरील ग्रामपंचायतीला अभियंता

By Admin | Updated: May 11, 2015 23:59 IST2015-05-11T23:59:08+5:302015-05-11T23:59:08+5:30

गावातील कामे करण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिकार देण्यात आले आहेत. मात्र संबंधित कामात तांत्रिक कामकाज ...

Engineer to Gram Panchayat on five thousand population | पाच हजार लोकसंख्येवरील ग्रामपंचायतीला अभियंता

पाच हजार लोकसंख्येवरील ग्रामपंचायतीला अभियंता

२८ गावांचा समावेश : गट अभियंता ९ तर पंचायत अभियंता १९
अमरावती : गावातील कामे करण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिकार देण्यात आले आहेत. मात्र संबंधित कामात तांत्रिक कामकाज करण्यासाठी अधिकार नव्हते. त्यामुळे ती कामे प्रलंबित राहत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यावन शासनाने राज्यातील पाच हजाराच्यावर लोकसंख्या असलेल्या दोन हजार ७५ ग्रामपंचायतींना पंचायत अभियंता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत स्तरावरील कामे तातडीने मार्गी लावणे शक्य होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील २८ ग्रामपंचायतीमध्ये अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गावपातळीवर विकासाचे केंद्रबिंदू असलेल्या ग्रामपंचायत ही सक्षम करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने पावले उचलली आहेत. त्याअंतर्गत आता तेरावा वित्त आयोग २५-१५ योजनेचा निधी यासह अन्य विकास कामांचा निधी आता पंचायत समितीकडे न येता ग्रामपंचायतींना देण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना काही कामे करण्याचा अधिकार प्राप्त झाला ओ. त्यात ज्या ग्रामपंचायतींचे उत्पनन ५० हजारापर्यंत आहे. त्या ग्रामपंचायतींना १० लाख आणि ज्याचे उत्पन्न ५० हजारापुढे आहे त्या ग्रामपंचायतींना १५ लाखांपर्यंतची कामे करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यासंदर्भातील अध्यादेशही नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या माध्यमातून होणाऱ्या विकासकामांसाठी राज्यातील ग्रामपंचायतींना कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होत आहे. ती कामे करताना अनेकदा योग्य तांत्रिक मार्गदर्शन मिळत नसल्याने राज्यामध्ये केलेल्या एका पाहणीमध्ये संबंधित गावातील कामे निधी असूनही तांत्रिक कारणामुळे प्रलंबित राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता शासनाने राज्यातील २ हजार ७५ ग्रामपंचायतींना पंचायत अभियंता देण्याचा निर्णय घेतला आहे.

अवैध बांधकामाला लागणार ब्रेक
ग्रामपंचायत पातळीवर अनेकदा ग्रामपंचायतीला कल्पना न देताच अनेक बांधकामे केली जातात. ग्रामपंचायतीत पंचायत अभियंता नेमल्यामुळे बांधकामाच्या संबंधित सर्व बाबींवर संबंधित अभियंता देखरेख ठेवणार आहे. त्यामुळे गावपातळीवर होणाऱ्या सर्व बांधकामावर त्यांचे लक्ष राहून अवैध बांधकामाला आळा बसणार आहे.

नऊ पंचायत समितीत गट अभियंता
जिल्ह्यात राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियाना अंतर्गत नऊ पंचायत समिती स्तरावर गट अभियंता नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये अमरावती, तिवसा, भातकुली, चांदूरबाजार, दर्यापूर, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर व मोर्शी पंचायत समितीचा समावेश आहे.

या ग्रामपंचायतीत पंचायत अभियंता
पथ्रोट, गौरखेडा कुंभी, कांडली, तळेगाव ठाकूर, करजगाव, शिरजगाव बंड, कुटुंगा, कापूसतळणी, बेनोडा शहीद, वडनेरगंगाई, नांदगाव खंडेश्वर, गायवाडी, पुसला, धारणी, घाटलाडकी, यावली शहीद, धामणगाव गढी, वाठोडा शुक्लेश्वर आणि वलगाव या १९ ग्रामपंचायतीत पंचायत अभियंता नियुक्त केले आहे.

Web Title: Engineer to Gram Panchayat on five thousand population

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.