ऊर्जा बचतीत महापालिका माघारली
By Admin | Updated: October 27, 2014 22:27 IST2014-10-27T22:27:59+5:302014-10-27T22:27:59+5:30
शासनाचे ऊर्जा बचतीचे धोरण असताना महापालिका मात्र ऊर्जा बचतीमध्ये पूर्णत: माघारली आहे. ऊर्जा बचतीसाठी अतिरिक्त पथदिवे कमी करण्याचे कार्यारंभ आदेश असताना अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही.

ऊर्जा बचतीत महापालिका माघारली
२० टक्के खर्चाचा बोझा कायम : अतिरिक्त पथदिवे काढलेच नाहीत
अमरावती : शासनाचे ऊर्जा बचतीचे धोरण असताना महापालिका मात्र ऊर्जा बचतीमध्ये पूर्णत: माघारली आहे. ऊर्जा बचतीसाठी अतिरिक्त पथदिवे कमी करण्याचे कार्यारंभ आदेश असताना अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही. त्यामुळे महापालिकेवर २० टक्के खर्चाचा जादा बोझा कायम आहे.
‘वीज वाचवा’ हा संदेश देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. या संदेशाचा परिणाम म्हणून काही प्रमाणात जनजागृती होऊन वीज वाचविण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेतला आहे. ऊर्जा बचतीच्या धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी महानगरातील अतिरिक्त पथदिवे कमी करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार एका सर्वेक्षणाअंती २० टक्के अतिरिक्त पथदिवे कमी करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या. काही महिन्यांपूर्वी येथील ‘मे.ब्राईट ईलेक्ट्रॉनिक्स कंपनी’ला अतिरिक्त पथदिवे कमी करण्याचे कंत्राट सोपविण्यात आले. मात्र, या कंपनीने आतापर्यंत अतिरिक्त पथदिवे काढले नसल्याची माहिती आहे. महानगरात पथदिव्यांची संख्या ३५ हजार असून यासाठी महापालिकेला महिन्याकाठी ७० ते ८० लाख रुपयांची देयके अदा करावी लागतात. ऊर्जा बचतीचा मार्ग महापालिकेने स्वीकारला असता तर आठ हजार अतिरिक्त पथदिवे कमी करुन १० ते १२ लाख रुपयांची बचत झाली असती. अधिक क्षमतेचे दिवे वापरु नयेत, असे ठरविले असताना महापालिकेच्या पथदिव्यांवर २५० वॅटचे मेटल हेडलाईट वापरले जात आहेत. ऊर्जा बचतीच्या धोरणाला हरताळ फासण्याचा प्रकार महापालिकेत सुरु असल्याचे दिसते. ऊर्जा बचतीप्रकरणी आयुक्तांनी लक्ष घालून यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचा मतप्रवाहदेखील यानिमित्ताने पुढे येऊ लागला आहे.