शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करेन
By Admin | Updated: October 3, 2015 00:20 IST2015-10-03T00:20:08+5:302015-10-03T00:20:08+5:30
माझा जन्म शेतकरी कुटुंबात झाला आहे. मला राजकीय वारसा असला तरी आपण राजकारणात येणार नाही.

शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करेन
अजयवीर जाखड : राजकारणात मला रस नाही
लोकमत मुलाखत
संदीप मानकर अमरावती
माझा जन्म शेतकरी कुटुंबात झाला आहे. मला राजकीय वारसा असला तरी आपण राजकारणात येणार नाही. परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी शेवटपर्यंत झटत राहू असे मत भारत कृषक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजयवीर जाखड यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.
देशाचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊ साहेब देशमुख यांनी शेतकऱ्यांना न्याय, सन्मान मिळाला पाहिजे. यासाठी १९५५ मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना केली. आज ६० वर्ष पूर्ण झाले आहे. शेतकऱ्यांचा मुलगा चांगला शिकला पाहिजे. परंतु राजकारणी लोकांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही. शेतमालाला हमीभाव मिळत नाही. विदर्भात विशेषत: अमरावतीत टेक्सस्टाईल हब सुरू होत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या कापसाला उत्पादन खर्चावर भाव देण्यास सरकार अपयशी ठरले असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताचे भविष्य गावात आहे. परंतु सरकारच्या योजना फक्त शहरासाठी तयार होतात. परंतु ग्रामीण भागाकडे त्यांनी पाठ फिरविल्याचा आरोप यावेळी जाखड यांनी केला. शेतकऱ्यांच्या मतांवर निवडणुकीच्या वेळी राजकारण केले जाते. आतातरी मताची किंमत ओळखून आवाज उठविला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग न निवडता सकारात्मक मानसिकता जपली पाहिजे. माध्यमांनी सुध्दा शहराच्या समस्यांऐवजी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्या ताकतीने मांडल्या गेल्या पाहिजे. गुजरातमध्ये हार्दिक पटेल आरक्षणासाठी लढत आहे, तसे प्रत्येक शेतकऱ्यांच्या मुलाला नोकरीत किमान २५ टक्के आरक्षण असले पाहिजे. असे झाल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक स्थिती उंचावून शेतकरी आत्महत्या थांबविण्यास मदत होईल. शेतकरी आर्थिकरीतीने सक्षम झाल्यास गावाच्या विकास होण्यासही मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या काही शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांचे अध्यक्ष आहेत ते राजकर्त्यांशी साटेलोटे ठेवतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आवाज दाबल्या गेला आहे. प्रत्येक राज्यांच्या शेतकऱ्यांच्या समस्या वेगवेगळ्या असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतातून कपासीवर नियमित बंदी लादली त्या वेळेस १८ महिन्यात सरकारला १७ वेळा अधिसूचना बदलावी लागली. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येतो. नुकतेच शेतकऱ्यांच्या प्रश्ना संदर्भात रिजर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या अधिकाऱ्यांशी भारत कृषक समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी भारत कृषक समाजाचे विदर्भाध्यक्ष वसंत लुंगे उपस्थित होते.