महिन्याअखेर पंचायत समिती सभापतीपदाची आरक्षण सोडत
By Admin | Updated: July 20, 2016 00:09 IST2016-07-20T00:09:32+5:302016-07-20T00:09:32+5:30
आगामी फेब्रुवारी २०१७ मध्ये जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत.

महिन्याअखेर पंचायत समिती सभापतीपदाची आरक्षण सोडत
प्रशासनात हालचाली : १४ पंचायत समितीसाठी निघणार ड्रॉ
अमरावती : आगामी फेब्रुवारी २०१७ मध्ये जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील १४ पंचायत समितीचे आरक्षण तातडीने काढण्याचे निर्देश २२ जून रोजी ग्रामविकास विभागाने जिल्हा प्रशासनाला पत्राव्दारे कळविले आहे. मात्र याला एक महिना होत असतानाही याची अंमलबजावणी प्रशासनाने केली नव्हती. याबाबत 'लोकमत'ने मंगळवारी वृत्त प्रकाशित करताच जुलै महिन्याचे शेवटी ही सोडत काढली जाणार असल्याचे निवडणूक विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
१४ पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुका होत असल्याने राजकीय पुढारी कामाला लागले आहेत. तर प्रशासनानेही निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषद सोबतच पंचायत समितीच्या एकत्र निवडणुका होणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची आरक्षण सोडत काढली आहे. मात्र पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत अद्याप निकाली काढली नाही. २२ जून रोजी राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्ह्यातील १४ पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आरक्षण सोडत तातडीने काढण्याचे निर्देश दिले होते. मात्र जिल्हा प्रशासनाने याची अंमलबजावणी केली नव्हती याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधताच निवडणूक विभागाचे वतीने पंचायत समिती सभापती पदाची सोडत जुलै महिन्याच्या शेवडच्या किंवा आॅगस्ट महिन्याचे पहिल्या आठवडयात सोडत काढण्याचे जवळपास निश्चित केले आहे. त्यासाठी प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षाचे लक्ष लागून असलेल्या या विषयाचा तिढा सुटणार आहे. (प्रतिनिधी)
ग्रामविकास विभागाचे सभापती आरक्षण सोडतीबाबत अद्याप सूचना मिळाल्या नाहीत. या सूचना मिळताच साधारणपणे ही सोडत चालू महिन्याअखेरीस काढली जाण्याची शक्यता आहे.
- राम सिध्दभट्टी,
नोडल अधिकारी निवडणूक विभाग