देवरणकरनगरातील अतिक्रमण काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 22:30 IST2018-09-26T22:29:50+5:302018-09-26T22:30:17+5:30
देवरणकरनगरातील महापालिकेच्या मैदानावर रघुवीर मोटर्स या गॅरेजचे संचालक प्रोमेंद्र बसरैया यांनी भंगार साहित्य, ट्रक व भंगार आॅटो ठेवून अतिक्रमण केले होते. यासंदर्भाचे वृत्त ‘लोकमत’ने लोकदरबारात मांडताच बुधवारी अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई करून सदर अतिक्रमण हटविले.

देवरणकरनगरातील अतिक्रमण काढले
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : देवरणकरनगरातील महापालिकेच्या मैदानावर रघुवीर मोटर्स या गॅरेजचे संचालक प्रोमेंद्र बसरैया यांनी भंगार साहित्य, ट्रक व भंगार आॅटो ठेवून अतिक्रमण केले होते. यासंदर्भाचे वृत्त ‘लोकमत’ने लोकदरबारात मांडताच बुधवारी अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई करून सदर अतिक्रमण हटविले.
अतिक्रमण निर्मूलन पथकाने आठ ट्रक भंगार साहित्य जप्त केले. यामध्ये १२ भंगार आॅटोरिक्षांचाही समावेश होता. ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली. मैदानावर गॅरेजच्या ठेवलेल्या भंगारात पावसाचे पाणी साचून राहते. परिणामी परिसरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. येथे एकाच कुुटुंबातील चौघांना डेंग्यूचे निदान झाल्याने यासंदर्भाची कैफियत नागरिकांनी बडनेऱ्याचे आमदार रवि राणा यांच्याकडे मांडली होती. त्यांनीसुद्धा ही बाब गांभीर्याने घेऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि कारवाईसंदर्भात महापालिका आयुक्त संजय निपाणे यांना सूचना केल्या.
महापालिका उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्या आदेशाने अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख गणेश कुत्तरमारे, निरीक्षक उमेश सवाई यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहे.
आणखी चार डेंग्यू पॉझिटिव्ह
शहरात आणखी डेंग्यूचे चार रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर राजापेठ येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. यामध्ये साईनगर परिसरात रहिवासी असलेल्या ३० वर्षीय महिलेला डेंग्यूची लागण झाली. इतर रुग्ण हे साईनगर व नवाथेनगर परिसरातील असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. रुग्णांमध्ये एका बँक कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. मंगळवारी अमरावती शहरात डेंग्यूचे नऊ रुग्ण आढळून आले. दोन दिवसांत डेंग्यूरुग्णांची संख्या ही १३ झाली आहे.