क्रीडा संकुल परिसरातील अतिक्रमण हटविले
By Admin | Updated: December 31, 2015 00:16 IST2015-12-31T00:16:54+5:302015-12-31T00:16:54+5:30
येथील विभागीय क्रीडा संकुल परिसरात येथीलच कंत्राटी कर्मचारी किसनराव डोळस यांनी अतिक्रमण करुन घर बांधले होते.

क्रीडा संकुल परिसरातील अतिक्रमण हटविले
विभागीय संकुल समितीचे आदेश : महानगरपालिकेची कारवाई
अमरावती : येथील विभागीय क्रीडा संकुल परिसरात येथीलच कंत्राटी कर्मचारी किसनराव डोळस यांनी अतिक्रमण करुन घर बांधले होते. बुधवारी क्रीडा संकुल समितीच्या आदेशाने पोलीस बंदोबस्तात महानगर पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने ही कारवाई करुन घर खाली केले. पूर्वी जिल्हा स्टेडियम समिती व नंतर विभागीय क्रीडा संकुल समितीने चौकीदार किसनराव बाजीराव डोळस यांना कामावर ठेवले होते.
आधी ते परिसरात झोपडी करुन राहायचे व नंतर संकुल परिसरात त्यांनी पक्के तीन छोटे घर बांधले. समितीने गेल्या अनेक वर्षांपासून मजुरीचा पगार काढले नसल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. तशी न्यायालयात प्रकरण चालू असल्याचे त्यांचे म्हणने आहे. परंतु २००९ पासून त्यांनी परिसरात अतिक्रमण केल्यामुळे येथे विकासात्मक कामांना अडथळा येत होता. त्यामुळे विभागीय क्रीडा संकुल समितीच्या निर्णयाने तहसीलदार सुरेश बागडे, पोलीस निरीक्षक आगलावे तसेच गाडगेनगर पोलिसांचा ताफा, जिल्हा अधिकारी अविनाश पुंड, महापालिकेच्या अतिक्रम निर्मूलन पथकाचे प्रमुख गणेश कुत्तरमारे, उमेश सवई व मनपाचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.