फरशीस्टॉप परिसरातील अतिक्रमण काढले
By Admin | Updated: September 4, 2015 00:28 IST2015-09-04T00:28:28+5:302015-09-04T00:28:28+5:30
स्थानिक फरशीस्टॉप परिसरात रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई गुरुवारी करण्यात आली. रस्त्यावरील पानटपऱ्या, ....

फरशीस्टॉप परिसरातील अतिक्रमण काढले
आयुक्तांचे आदेश: अतिक्रमण निर्मूलन विभागाची कारवाई
अमरावती: स्थानिक फरशीस्टॉप परिसरात रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई गुरुवारी करण्यात आली. रस्त्यावरील पानटपऱ्या, हॉटेलचे १५ फूटपर्यंत करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्यात आले आहे. ही कारवाई आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
फरशीस्टॉप परिसरात सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वींचे हे अतिक्रमण वाहतुकीसाठी अडथळा ठरणारे होते. याविषयी नागरिकांच्या तक्रारी देखील प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्या नेतृत्त्वात हे अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता. तसेच यशोदानगर परिसरात पंचशील झेंडाजवळ एका महिलेने झोपडी बांधून अतिक्रमण केले होते. दरम्यान ही झोपडी सुध्दा जमिनदोस्त करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पाणेरीच्या नावाने जागा ताब्यात घेऊन तेथे कार्यालय थाटण्यात आल्यामुळे हे अतिक्रमण हटविण्यात आले आहे. कारवाई दरम्यान अभियंता घनशाम वाघाडे, मनीष हिरोडे, उमेश सवाई, प्रितम रामटके आदी उपस्थित होते. अतिक्रमण हटविण्याची कारवाई निरंतर सुरु राहिल, असे गणेश कुत्तरमारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.