परतवाड्यात आजपासून अतिक्रमण हटाव मोहीम

By Admin | Updated: May 22, 2015 00:42 IST2015-05-22T00:42:40+5:302015-05-22T00:42:40+5:30

दुकानदारांनी केलेले अतिक्रमण, त्यामुळे अरूंद झालेले रस्ते, वाहनांची वाढती संख्या, शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरत असल्याने महसूल विभागाचे प्रशिक्षणार्थी

Encroachment Removal Campaign From Today | परतवाड्यात आजपासून अतिक्रमण हटाव मोहीम

परतवाड्यात आजपासून अतिक्रमण हटाव मोहीम

सुनीश देशपांडे अचलपूर
दुकानदारांनी केलेले अतिक्रमण, त्यामुळे अरूंद झालेले रस्ते, वाहनांची वाढती संख्या, शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरत असल्याने महसूल विभागाचे प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनात नगरपालिका शुक्रवार २२ मे पासून अतिक्रमण हटाव मोहीम राबविणार आहे. ही मोहीम तीन दिवस चालणार असून यामध्ये तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, नझूल अधिकारी सहभागी होणार आहेत. यामुळे रस्त्यांचा कोंडलेला श्वास मोकळा होणार आहे.
येथील मुख्य रस्त्यापासून ते गल्लीबोळात दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने मूळ रस्त्यांची रुंदी कमी झाली आहे. त्यात बांधलेल्या खासगी कॉम्प्लेक्सला पार्किंग झोन नसल्याने लोक रस्त्यावर वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन लहानमोठे अपघात होतात.
अचलपूर नगरपालिकेने यापूर्वी अनेकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. पण पुन्हा तेथे अतिक्रमण होऊ नये यासाठी दक्षता न घेतल्याने काही दिवसात ‘जैसे थे’ ची परिस्थिती निर्माण झाली. अनेकदा अतिक्रमण हटवू नये म्हणून नगरसेवकांचा दबाव येत असे, असे संबंधित अधिकारी सांगत असत. मागील १५ दिवसांपूर्वी आलेले अचलपूर नवनियुक्त प्रशिक्षणार्थी, उपविभागीय अधिकारी शनमुगम राजन यांच्या पुढाकाराने अतिक्रमण हटाव मोहीम शुक्रवारपासून सुरू होणार आहे. त्यासाठी प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली असून पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबविली जाणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, अतिक्रमण हटविण्यापूर्वी अतिक्रमितांना ध्वनीक्षेपकाद्वारे सूचना देण्यात आल्या. तसेच नोटीसही देण्यात आली. अतिक्रमितांनी स्वयंस्फूर्तीने आपले अतिक्रमण हटवावे, अन्यथा नगरपालिका बुलडोजरने ते अतिक्रमण काढतील. यात नुकसान झाल्यास अतिक्रमणधारक जबाबदार राहतील, अशाही सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत.
काही अतिक्रमित दुकानदार रस्त्यापर्यंत आपला विक्रीचा माल ठेवत असल्याने लहानमोठे अपघात नित्याचीच बाब झाली आहे. त्यांचे प्रथम अतिक्रमण जमीनदोस्त केल्यानंतर उपविभागीय अधिकारी अचानक भेट देऊन कुणी दुकानाबाहेर माल आणून ठेवलेला असल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करतील, अशीही माहिती सूत्रांकडून मिळाली.

Web Title: Encroachment Removal Campaign From Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.