Encroachment of members in Gujari Bazaar | गुजरीबाजारात सदस्यांचे अतिक्रमण
गुजरीबाजारात सदस्यांचे अतिक्रमण

ठळक मुद्देनगरपंचायतचे दुर्लक्ष । सर्वे क्र. १२६ चा श्वास गुदमरला

लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : शहराचे हृदयस्थानी असणाऱ्या सर्व्हे नंबर १२६ मधील गुजरी बाजार आजही उद्धाराच्या प्रतीक्षेत आहे.
सर्व्हे नंबर १२६ मधील अतिक्रमण जमीनदोस्त करण्याबाबत अनेक वेळा नगरपंचायतीकडून जाहीर करण्यात आले. मात्र, सदर जमीन महसूल विभागाकडून मिळाली नसल्याने आजही सर्व्हे नंबर १२६ ला अतिक्रमणाचा विळखा आहे. इंग्रज काळापासून सर्व्हे नंबर १२६ ची जागा गुजरी बाजार म्हणून ओळखली जाते. कालांतराने सदर सर्व्हे नंबर १२६ ची जवळपास सात एकर जमीन जिल्हा परिषदेला हस्तांतरित करण्यात आली. तेव्हापासून जिल्हा परिषदेद्वारे पूर्वी ग्रामपंचायतच्या माध्यमाने आणि आता नगरपंचायतमार्फत गुजरी बाजाराचा जाहीर लिलाव करण्यात येतो. ही जागा पूर्णपणे नगरपंचायतला मिळावी, यासाठी नगरपंचायत प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आलेली आहे. ही मागणी अंतिम टप्प्यात असल्याचे वारंवार सांगितले जाते. मात्र, याबाबत खरी परिस्थिती समोर येत नसल्यामुळे सर्व्हे नंबर १२६ आजही अतिक्रमणाच्या विळख्यात आहे.
धारणी शहर हे तालुका मुख्यालय आहे. या शहराचा विकास झपाट्याने होण्यासाठी विकासकामांची गती वाढावयास हवी. तथापि, एकाच जागेच्या विकासासाठी बरीच वर्षे प्रतीक्षा करावी लागत आहे. विविध व्यापाºयांकडून सर्व्हे नंबर १२६ मध्ये अतिक्रमण केले गेल्यामुळे शहराचा विकास खुंटला आहे.

व्यापारी संकुलाच्या निर्मितीची मागणी
नगरपंचायत कार्यालयाला लागून दक्षिणेकडे असलेल्या सर्व्हे नंबर १२६ मधील गुजरी बाजारात जागोजागी झालेल्या अतिक्रमणामुळे लहान-सहान आदिवासी भाजीपाला विक्रेत्यांसाठी व्यवसाय हा कष्टदायी ठरत आहे. या जागेवरील संपूर्ण अतिक्रमण निर्मूलन केल्यास जवळपास ५०० गाळ्यांची उभारणी होऊन पद्धतशीरपणे बाजारपेठेची निर्मिती करण्यात येऊ शकते. मात्र, आजी-माजी सदस्य, त्यांचे नातेवाईक यांचाच जनप्रतिनिधींच्या वर अतिक्रमण करण्यांमध्ये सर्वाधिक भरणा असल्यामुळे ही जमीन विकसित करण्याबाबत प्रश्नचिन्ह लागले आहेत.

वारंवार निवडणूक आचारसंहिता लागू होत असल्याने सर्व्हे नंबर १२६ नगरपंचायतीस मिळण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होत आहे. लवकरच जिल्हाधिकाºयांकडून सर्व्हे नंबर १२६ चे अधिकार नगरपंचायतीस मिळताच गाळे निर्मितीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
- शैलेंद्र जांबेकर, नगराध्यक्ष, धारणी नगरपंचायत.

Web Title: Encroachment of members in Gujari Bazaar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.