शासकीय जागेवर अतिक्रमण वाढले
By Admin | Updated: January 12, 2016 00:16 IST2016-01-12T00:16:07+5:302016-01-12T00:16:07+5:30
शहरात अलीकडे नवीन प्रकार उघडकीस आला आहे. अतिक्रमण करा व शासनाचे जावई व्हा, ...

शासकीय जागेवर अतिक्रमण वाढले
महसूल विभाग झोपेत : उपाध्यक्षांच्या प्रभागातच अतिक्रमण
धारणी : शहरात अलीकडे नवीन प्रकार उघडकीस आला आहे. अतिक्रमण करा व शासनाचे जावई व्हा, हा नवीन फंडा नगरपंचायत आल्यानंतर सुरू झाल्याने नगर पंचायतीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे हा प्रकार नगरपंचायत उपाध्यक्षांच्या प्रभागातच सुरू आहे. उपाध्यक्षांनी अतिक्रमणधारकांना हटकले असता दुसऱ्याच प्रभागातील नगरसेवकाने या अवैध प्रकाराला आश्रय दिल्याचा प्रकार उघडकीस आला.
शहराच्या मध्यभागी व कस्तुरबा गांधी विद्यालयाच्या पाठीमागे शासकीय भूखंड सर्वे नं. ८१, ८२ व ८३ आहे. या भूखंडापैकी काही भूखंड तत्कालीन उपविभागीय अधिकारी संजय अग्रवाल यांनी जाहीर लिलावाच्या माध्यमातून विकून टाकले होते. काही भूखंड म्हाडाला हस्तांतरित करण्यात आले होते. उर्वरित भूखंड महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी राखीव ठेवण्यात आले होते. याच खुल्या जागेवर मागील सहा महिन्यांपासून अतिक्रमणाचा सपाटा सुरू आहे. याठिकाणी टीन शेड, कच्ची घरे व अँगल गाडून अतिक्रमणाचा सपाटा सुरू केला आहे. अशाप्रकारे अतिक्रमणधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व नगरपंचायतीकडे वारंवार तक्रारी केल्यात. मात्र, त्यांचा काहीही उपयोग झालेला नाही. उलट तक्रारकर्त्यांवरच विनयभंगासारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे या अतिक्रमणधारकांना अभय कोेणाचे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. (तालुका प्रतिनिधी)