शासकीय जमिनींवर अतिक्रमण

By Admin | Updated: August 29, 2016 00:04 IST2016-08-29T00:04:23+5:302016-08-29T00:04:23+5:30

जिल्ह्यातील ब्रिटिशकाळापासून सार्वजनिक मालमत्ता असलेल्या शासकीय जागेला अतिक्रमणाचे ग्रहण लागले आहे.

Encroachment on government lands | शासकीय जमिनींवर अतिक्रमण

शासकीय जमिनींवर अतिक्रमण

३७ हजार हेक्टर जमीन : सार्वजनिक जागा, गायरान ग्रामस्थांच्या मालकीचे !
मोहन राऊत धामणगाव रेल्वे
जिल्ह्यातील ब्रिटिशकाळापासून सार्वजनिक मालमत्ता असलेल्या शासकीय जागेला अतिक्रमणाचे ग्रहण लागले आहे. जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांतील ३७ हजार हेक्टर जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली आहे़ गावात सार्वजनिक ठिकाणे असलेली जागा व गायरान ग्रामस्थांच्या मालकीचे बनले आहेत
ब्रिटिशकाळापासून प्रत्येक गावात सार्वजनिक उत्सवासाठी जागा आरक्षित असते. तसेच स्मशानभूमी, सार्वजनिक मंदिरे, पाणीपुरवठा, दवाखाना, शाळा बांधकाम आदी सार्वजनिक कामाकरिता ग्रामपंचायतीमध्ये या जागेची नोंद असते या जागेचे संरक्षण करणे ग्रामपंचायतीची जबाबदारी असताना या सार्वजनिक जागेवर गावात अतिक्रमण करून ग्रामपंचायतीच्या आठ 'अ' ला नोंदणी करण्याचे प्रकार वाढले आहेत़
विशेषत: अशा जागांवर अनधिकृत बांधकाम करून ही जागा अनेक गावांतील पुढाऱ्यांनी आपल्या नावाने केली असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे़
गावातील जनावरे चारण्यासाठी प्रत्येक गावाच्या परिसरात गायरान म्हणून जागा अनेक वर्षांपासून आरक्षीत असताना ही जागा तलाठ्यांना हातात घेऊन स्वत:च्या नावाने जागा मालकीची करण्यात आली आहे़ भोगवट वर्ग २ ची असलेली जागा काहींनी महसूल प्रशासनाच्या हातात हिरव्या नोटांचा गठ्ठा देऊन भोगवट वर्ग १ करून अशा जमिनींची नोंद करवून या जमिनीची विक्री करण्याचे व्यवहार जिल्ह्यात युद्धस्तरावर सुरू आहे़

मृत व्यक्तींच्या जमिनीही दलालांच्या घशात
गावातील अनेक वर्षांपासून वास्तव्य असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला व त्या व्यक्तीला वारस नसेल तर अशा जमिनीवर दलालांनी ताबा घेतला आहे़ जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात खोट्या खरेदी खत करून या जमिनी दलालांनी मागील पाच वर्षात बळकावल्या आहे़ गावातील तलाठ्यांनी कोणताही जाहिरनामा काढण्याऐवजी तथा या जमिनी सरकारजमा न करता अशा शेतजमिनीच्या सातबारावर दलालाचे नाव चढविले आहे.

देवस्थांनाच्या जमिनींचा गैरवापर
प्रत्येक गावातील देवस्थांनाच्या देखभालीसाठी खर्चाची तजवीज करण्याकरीता जमिनी राखीव ठेवण्यात आल्या आहेत़ या उत्पन्नातून संबधीत देवस्थांनाचा खर्च करण्यात यावा, हा या मागचा उद्देश असताना देवस्थांनाच्या जमिनीची ९९ वर्षाच्या कराराने परस्पर विक्री करण्यात आली आहे़ जिल्ह्यातील ४७ देवस्थानाच्या मालकीच्या जमिनी ताब्यात घेतल्याची धक्कादायक माहिती आहे़

शाळांच्या जमिनीवर अतिक्रमण
प्रत्येक गावात जिल्हापरिषदेंतर्गत शाळांच्या जमिनी आहेत़ दरवर्षी या जमिनींता वर्षभराकरिता पिके काढण्यासाठी लिलाव केला जातो. शिक्षण विभागाला यातून रक्कम मिळत असली तरी अशा जमिनीवर ग्रामस्थांनी अतिक्रमण केले आहेत़ धामणगाव, चांदूररेल्वे, तिवसा या तीन तालुक्यातील शाळांच्या जमिनी ग्रामस्थांच्या ताब्यात गेल्या आहेत़ महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे़

Web Title: Encroachment on government lands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.