सुवर्ण व्यवसायावर गदा, बंगाली कारागिरांचे अतिक्रमण
By Admin | Updated: May 10, 2015 00:36 IST2015-05-10T00:36:03+5:302015-05-10T00:36:03+5:30
एकीकडे श्रीमंत असल्याचा गैरसमज दुसरीकडे बंगाली कारागिरांचे व्यवसायावर अतिक्रमण तर तिसरीकडे बेरोजगारांची वाढती ...

सुवर्ण व्यवसायावर गदा, बंगाली कारागिरांचे अतिक्रमण
त्रिकोणी संघर्षात अडकला समाज : सोनार समाजाची ससेहोलपट
मोहन राऊत अमरावती
एकीकडे श्रीमंत असल्याचा गैरसमज दुसरीकडे बंगाली कारागिरांचे व्यवसायावर अतिक्रमण तर तिसरीकडे बेरोजगारांची वाढती संख्या अशा त्रिकोणी संघर्षात राज्यातील सोनार समाज बांधव अडकला आहे. ऐरणीवर सोने ठोकताना भक्तीचे ध्यान करीत संत नरहरी महाराजांना विठ्ठल मिळाला. आता या समाजाची ससेहोलपट थांबणार कधी, असा प्रश्न नेक्स्ट जनरेशन विचारत आहे़
बारा बलुतेदारांपैकी एक बलुतेदार म्हणून समाजव्यवस्थेने निर्माण केलेल्या फळीमधला एक उपेक्षित राहिलेला समाज म्हणजे सोनार आजही या बारा बलुतेदारांपैकी एक असलेल्या जातीचे विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी शासन उदासीन असल्याने तो समाज उपेक्षीतच राहीला आहे़ एवढेच नाही तर आपला कौटुंबिक गाडा चालविण्यासाठी गावोागावी जाऊन आपला उदरनिर्वाह भागवावा लागत आहे़
सोनार समाज अहीर किंवा खानदेशी, अझर देवांग अथवा दैवज्ञ अथवा पंचाग सोनार, देशी किंवा मराठे सोनार, विदूर, कन्नड, कोकणी, लाड, माळवी, परदेशी, साड, शिलवंत, वैद्य, अथवा जैन या उपजाती राज्यात येतात़ या समाजाने अनेक पिढ्यांपासून आपली कला जोपासली आहे़ पूर्वीच्या आपल्या घराच्या पुढच्या भागात दुकान राहत असत. या दुकानात अनेक आविष्कारी दागिने तयार केली जात असत. आता ज्वेलरीने मोठी जागा घेतली आहे़ मोठ्या कॉपोरेट कंपन्यांनी ग्राहकांना नवीन आकाराचे दागिने बाजारात उपलब्ध करून दिल्याने गावकुसातील या समाजावर उपासमारीचे पाळी आली आहे़ या समाजातील शिक्षणाचे प्रमाण अधिक असले तरी रोजगार मिळत नाही. स्वरोजगारासाठी शासन पाऊल उचलत नसल्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढली आहे़ सोन्या-चांदीसारख्या मौल्यवान धातूंचे सोनार हे काम करत असल्यामुळे यांना श्रीमंत समजले जाते़ परंतु हा केवळ गैरसमज आहे़
सध्या सोनारांची उपासमार सुरू आहे़ क धी या सोनाराला रोजचे शंभर दोनशे रूपये मिळत असे. त्यात ते आपला उदरनिर्वाह भागवीत असत. परंतु आज त्यांना शंभर रूपयेसुध्दा मिळत नाहीत, ही शोकांतिका आहे.
त्याला आपल्या कामासाठी गावोगावी फिरूनही कामे मिळत नाही़ सध्याची परिस्थिती पाहिली तर त्या सोनाराजवळ पोट भरण्यासाठीसुध्दा पैसे नाही. अशा महागाईच्या परिस्थितीमध्ये एका सोनाराला आपला उदरनिर्वाह चालवणे कुटुंबांना सुविधा देणे संभव होत नाही़ शहरात दिवसातून आठ-दहा घंटे एका जागेवर बसून काम केल्यामुळे सोनाराला आपल्या वयाच्या चाळीशीतच गुडघे दुखणे, पाठीच्या कन्याचे दुखणे या आजारांचा सामना करावा लागतो़ सोनार पन्नास वर्षाच्या पुढे काम करू शकत नाहीत़ त्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्याचा प्रश्न गंभीर बनत आहे़ आज या व्यवसायावर बंगाली कारागिरांमुळे स्थानिक कारागीर अधिक हतबल झाला आहे़ सुवर्ण व्यवसायावर गदा आणणारे कलम लावण्यात येत आहे़ बेरोजगार कारागिरांना रोजगार मिळावा, उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शासनाने अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे़