धारणी मुख्यमार्गावरील अतिक्रमण काढले
By Admin | Updated: August 15, 2016 00:04 IST2016-08-15T00:04:21+5:302016-08-15T00:04:21+5:30
गुरुवारी थांबविण्यात आलेली अतिक्रमण काढण्याची मोहीम रविवारी पुन्हा राबविण्यात आली.

धारणी मुख्यमार्गावरील अतिक्रमण काढले
धारणी : गुरुवारी थांबविण्यात आलेली अतिक्रमण काढण्याची मोहीम रविवारी पुन्हा राबविण्यात आली. शहरातील मुख्यमार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले. बस स्थानकापासून मधवा व्यापारी प्रतिष्ठानासमोरील ओटे जेसीबीच्या सहायाने तोडण्यात आले तर व्यापाऱ्यांनी स्वत: अतिक्रमण काढून बांधकाम विभागाला सहकार्य केले.
अमरावती-बुरहानपूर मुख्य मार्गावर हातगाड्या व व्यापाऱ्यांच्या दुकानामुळे पूर्णपणे झाकले गेले होते. रस्त्याच्या दुतर्फा थाटलेल्या दुकानांमुळे शहराचा श्वास गुदमरत होता. तो मोकळा व्हावा म्हणून लोेकमतने वारंवार पाठपुरावा केला. या गंभीर बाबीची दखल थेट तालुका वकील संघाने घेतली. वकील संघाच्या सर्व सदस्यांनी एकमताने निर्णय घेत या विषयावर बांधकाम विभाग, उप विभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस स्टेशनला निवेदन देऊन वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून मुख्यमार्गावरील अतिक्रमण काढण्याबाबत पत्र दिले होते. त्याची दखल घेत बांधकाम विभागाने गुरूवारी ११ आॅगस्ट रोजी मुख्यमार्गावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरु केली. गुरुवारी दयाराम चौक ते हनुमान चौकापर्यंत अतिक्रमण हटविण्यात आले होते.
बांधकाम विभागाने पोलिसांसमक्ष अतिक्रमण हटविले. यापुढे पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून नगरपंचायत व पोलीस विभागाने दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. रस्ता दुभाजकाचे काम दिवाळीपर्यंत सुरु होईल. तोपर्यत वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची आहे.
-मिलिंद पाटणकर, एसडीओ,धारणी