चांदणी चौकातील अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2016 00:04 IST2016-07-09T00:04:41+5:302016-07-09T00:04:41+5:30
सलग तिसऱ्या दिवशीही शहराच्या विविध भागात पालिकेचे बुलडोजर चालले. यात चांदणी चौक, नागपूरी गेट, टांगापडाव, चित्रा चौक, गांधी चौक, न्याय भवनामागील अतिक्रमण हटविण्यात आले.

चांदणी चौकातील अतिक्रमण हटविले
पोलिसांचा तगडा बंदोबस्त : कारवाईला विरोध
अमरावती : सलग तिसऱ्या दिवशीही शहराच्या विविध भागात पालिकेचे बुलडोजर चालले. यात चांदणी चौक, नागपूरी गेट, टांगापडाव, चित्रा चौक, गांधी चौक, न्याय भवनामागील अतिक्रमण हटविण्यात आले. कारवाईदरम्यान पोलीस आणि महापालिकेच्या पथकाला जोरदार विरोधही करण्यात आला. परंतू तगड्या पोलीस बंदोबस्तासमोर अतिक्रमणधारकांचा विरोध टिकू शकला नाही.
महापालिका व पोलिस प्रशासनाची शहरभर संयुक्त कारवाई सुरु आहे. इतवारा चौक, नागपूरी गेट, चित्रा चौक तहसिल कार्यालय आदी ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांनी डोके वर काढले होते. फेरीवाल्यांनी शहरातील मोक्याच्या जागांसह पदपथही गडप केले. त्यांच्याविरुध्द तिन दिवसांपासून कारवाईचा बडगा उगारल्या जात आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी निर्मुलन पथकाने व शहर पोलिसांनी कारवाई करुन अनेक व्यवसायिकांचे तीन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले आहे. पावसामुळे कारवाई करण्यास अडचण निर्माण झाली होती. या भागातील अतिक्रमणधारकांना कारवाईपूर्वी स्वयंस्फुर्तीने अतिक्रमण काढण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. उर्वरित अतिक्रमणावर शनिवारी सकाळी ९ वाजतापासून हातोडा फिरणार आहे. त्यात चित्रा चौक ते वलगाव रोड आणि श्याम चौक ते साबनपूरा रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाचे प्रमुख गणेश कुत्तरमारे यांनी 'लोकमत'ला दिली.
नागपुरीगेटमध्ये चालला बुलडोजर
अमरावती : गाडगेनगर, बसस्थानक परिसर व अनेक ठिकाणी शहरभर कारवाई करण्यात आली. मात्र ईतवारा बाजार, चांदणी चौक, आदी भागात कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने व पोलिस प्रशासनाने कठोर भुमिका घेऊन कारवार्इंचा बळगा उगारण्यात आला. कारवार्इंच्या भीतीने अनेक नागरिकांनी स्वताच अतिक्रमण काढले.