बीएसएनएलच्या जागेवरील अतिक्रमण हटविले
By Admin | Updated: August 3, 2015 00:10 IST2015-08-03T00:10:06+5:302015-08-03T00:10:06+5:30
सातुर्णाजवळील बीएसएनएलच्या जागेवर राणा शैक्षणिक संस्थेने केलेले अतिक्रमण शनिवारी पोलिस बंदोबस्तात हटविण्यात आले.

बीएसएनएलच्या जागेवरील अतिक्रमण हटविले
दोन दिवस बंदोबस्त : जागांची सीमा निर्धारित
अमरावती : सातुर्णाजवळील बीएसएनएलच्या जागेवर राणा शैक्षणिक संस्थेने केलेले अतिक्रमण शनिवारी पोलिस बंदोबस्तात हटविण्यात आले. बीएसएनएल कर्मचारी संघटनेच्या मागणीवरून अतिक्रमण हटविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. भूमि अभिलेख विभागाकडून जागेची मोजणी करण्यात आली असून बीएसएनएल व राणा शैक्षणिक संस्थेच्या जागेची सीमा निर्धारित केली आहे. राजापेठ पोलिसांनी रविवारी पोलीस कर्मचारी बीएसएनएलच्या जागेवर सज्ज केले आहेत.
सातुर्णाजवळील क्रांती कॉलनी मार्गावर भारतीय दूरसंचार निगम विभागाची सर्व्हे क्रमांक ४९/२ यातील ०.८ आर जमीन असून तेथील जागेवर बीएसएनएलमार्फत ६२ मीटरची संरक्षण भिंत बांधण्यात आली. मात्र, ती भिंत तोडून तेथे सिमेंटचे पिल्लर उभारण्यात आल्याचे बीएसएनएलचे उपविभागीय अभियंता प्रवीण इसोकार यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी तत्काळ राजापेठ पोलीस ठाणे गाठून अज्ञात आरोपीविरुध्द तक्रारी नोंदविली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ४४७ अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केल्यावर बीएसएनएलच्या जागेबाजूलाच आ. राणा यांच्या गंगा सावित्री ट्रस्टद्वारा संचालित राणा एज्युकेशन सोसायटीची असल्याचे उघड झाले. त्यातच बीएसएनएलच्या संघटनेने अतिक्रमण हटावची मागणी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे केली होती. शनिवारी जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशाने भूमि अभिलेख विभागाने जागेची मोजणी करून पोलिसांच्या चोख बंदोबस्तात अतिक्रमित भिंत तोडली. यावेळी बीएनएनएल संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.एस. राऊत, विभागीय सचिव एस.एच. गांधी, व्ही.ए. भटकर, पी.जी. वानखडे, डी.एच. भट, एस.आर. काळमेघ, एस.एम. बहुरुपी, ए.एम. राऊत उपस्थित होते. (प्रतिनिधी)