अतिक्रमितांना मिळणार पंतप्रधान आवास योजनेचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:12 IST2021-04-10T04:12:41+5:302021-04-10T04:12:41+5:30
मोर्शी : नगरपरिषद हद्दीतील शासकीय जागेवर तात्पूर्ती घरे बांधून राहणाऱ्या अतिक्रमणधारकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळणार आहे. सर्व ...

अतिक्रमितांना मिळणार पंतप्रधान आवास योजनेचा लाभ
मोर्शी : नगरपरिषद हद्दीतील शासकीय जागेवर तात्पूर्ती घरे बांधून राहणाऱ्या अतिक्रमणधारकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळणार आहे. सर्व गोरगरिबांना हक्काचे घरकुल मिळावे. यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना अमलात आणली. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मोर्शी शहरामध्ये घरकुल योजना सन २०१७ पासून लागू करण्यात आली.
या योजनेत ९६३ लाभार्थ्यांपैकी स्वत:ची जागा असलेल्या ५४३ लाभार्थ्यांना घरकुल वितरित करण्यात आले. मात्र नगरपरिषद हद्दीत येत असलेल्या शासकीय जागेवर केलेल्या अतिक्रमणधारकांचे प्रस्ताव नगर परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना पाठविण्यात आले होते. त्या अनुषंगाने जिल्हा समितीमार्फत ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत मोर्शी शहरातील गिट्टीखदान परिसरातील ३८ व रामजीबाबा परिसरातील ३८ अशा एकूण ७६ अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यात आल्याने त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळणार आहे. नगर परिषदेच्या असेसमेंटवर आता शासकीय जागेवर केलेल्या अतिक्रमणधारकांची नावे येणार असून, ते त्या जागेचे मालक होणार आहे. ज्या घरकुलधारकांची घरे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पूर्णत: बांधकाम करण्यात आली त्यांना शेवटचा टप्पा देण्यात यावा. तसेच घरकुल लाभार्थ्यांचे अतिक्रमण प्रकरणे त्वरित निकाली काढावे. या मागणी संदर्भात भाजपाचे शहराध्यक्ष रवी मेटकर, माजी नगरसेविका सुनीता कुमरे यांच्या नेतृत्वात भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगर परिषदेच्या आवारात अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी अतिक्रमणधारकांची अतिक्रमणे नियमानुकूल केली.
------