एका ठिकाणी ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांची होणार उचलबांगडी
By जितेंद्र दखने | Updated: June 20, 2023 18:41 IST2023-06-20T18:41:01+5:302023-06-20T18:41:12+5:30
जिल्हा परिषद : विविध विभागांत अनेकजण तळ ठोकूनच

एका ठिकाणी ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांची होणार उचलबांगडी
अमरावती : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेत हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता एकाच ठिकाणी एका टेबलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची इतरत्र बदली होणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनात सध्या जोरदार तयारी सुरू आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र नुकतेच आटोपले आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या आपसी, विनंती व प्रशासकीय बदल्यांची कारवाई नुकतीच पूर्ण झाली. त्यानंतर आता सामान्य प्रशासन विभागामार्फत एकाच विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची उचलबांगडी करण्याच्या अनुषंगाने माहिती संकलन व विभाग आणि टेबल बदलाची पक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन, बांधकाम, वित्त, पाणीपुरवठा, जलसंधारण, आरोग्य, समाज कल्याण, पशुसंवर्धन, महिला बालकल्याण, शिक्षण पंचायत अशा सर्व विभागांत गेल्या पाच वर्षांपासून अनेक कर्मचारी एकाच टेबलवर एकाच ठिकाणी बसून आपले कामकाज करत आहेत.
मात्र शासनाच्या धोरणानुसार एकाच विभागात सलग पाच वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचे अंतर्गत टेबल बदल किंवा कार्यालय बदल करणे आवश्यक आहे. त्यानुसार आता जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेने विविध विभागांत गेल्या काही वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्याच्या दृष्टीने माहिती संकलन करणे सुरू केले आहे. लवकरच या कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून यासाठी केव्हाचा मुहूर्त काढला जातो, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.