बच्चू कडूंचा पोलीस प्रशासनाविरुद्ध एल्गार
By Admin | Updated: July 5, 2016 00:23 IST2016-07-05T00:23:01+5:302016-07-05T00:23:01+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षकांसह काही पोलीस अधिकाऱ्यांनी चालविलेली गुंडगिरी सामान्यांसाठी त्रासदायक आहे.

बच्चू कडूंचा पोलीस प्रशासनाविरुद्ध एल्गार
अन्नत्याग आंदोलन : पोलीस अधिकाऱ्यांवर गुंडगिरीचा आरोप, प्रहार कार्यकर्त्यांवरील कारवाई मागे घ्या
अमरावती : जिल्हा पोलीस अधीक्षकांसह काही पोलीस अधिकाऱ्यांनी चालविलेली गुंडगिरी सामान्यांसाठी त्रासदायक आहे. या पोलीस अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळेच जिल्ह्यात अवैध धंदे फोफावले आहेत. त्यात प्रहार कार्यकर्त्याला तडीपार करून पोलिसांनी पक्षपातीपणाचा परिचय दिला आहे. तडीपारीचा हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, या मागणीसाठी सोमवारी आ. बच्चू कडू यांनी शिवटेकडी परिसरात अन्नत्याग आंदोलन करून पोलीस प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला.
बच्चू कडुंच्या आंदोलनाबाबत पोलीस प्रशासनाला माहिती मिळताच आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम व काही पोलीस अधिकारी अवैध व्यवसायांना खतपाणी घालत असल्याचा खुलेआम आरोप आ. कडू यांनी केलो. जिल्ह्यात सर्रास अवैध गुटखाविक्री सुरू आहे. यासाठी पोलीस अधीक्षक महिन्याकाठी १० लाख तर ठाणेदार व अंमलदारांना एक लाख रूपये महिना पुरवित असल्याचा आरोप देखील कडू यांनी केला आहे. असे असताना समाजकार्य करणाऱ्या प्रहारच्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रकार पोलीस करीत आहेत.
प्रहारच्या एका कार्यकर्त्यावर पोलीस प्रशासनाने तडिपारीची कारवाई करून पोलिसांनी जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न चालविल्याचा आरोेप करीत आ. बच्चू कडू यांनी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढलेत. आ. कडूंचा मोठे भाऊ छोटू कडू यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई आकसपूर्ण असल्याचा आरोपही बच्चू कडूंनी केला. पोलिसांनी प्रहार कार्यकर्त्यावरील तडीपारीची कारवाई मागे घ्यावी, या मागणीसाठी आ.बच्चू कडू यांनी पोलीस प्रशासनाविरोधात आंदोलन छेडले. पोलीस अधीक्षकांसह दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आ.बच्चू कडू यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे केली आहे. यावेळी छोटू महाराज वसू, रोशन देशमुख, चंदू खेडकर, मनोज देशमुख उपस्थित होते.
शिवटेकडी ते सीपी कार्यालय मार्ग बंद, तगडा बंदोबस्त
आ. बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर शहर पोलिसांनी शिवटेकडी ते सीपी कार्यालयापर्यंतचा मार्ग बंद केला होता. त्यामुळे वाहनधारकांची अडचण झाली. या मार्गाने दररोज ये-जा करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. आ.कडू यांच्या आंदोलनासाठी पोलीस विभागाने मार्ग तर बंद केलाच, तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावला होता. एसीपींच्या नेत्तृत्त्वात पोलीस अधिकाऱ्यांसह तब्बल १०० पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात होता.
वाढदिवसाच्या आदल्या दिवशी आंदोलन
आ. बच्चू कडू यांचा उद्या ५ जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस साजरा करण्याकरिता कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. मात्र, पोलीस प्रशासनाच्या मनमानीला आळा घालण्यासाठी त्यांनी वाढदिवसाच्या एकदिवस आधीच अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक यवतमाळात
आ.बच्चू कडू यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांसह काही पोलीस अधिकाऱ्यांविरोधात अन्नत्याग आंदोलन केले. विशेष पोलीस महानिरीक्षक संजीव सिंघल यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, आयजी सिंघल हे यवतमाळ गेले असल्यामुळे आ.बच्चू कडू यांची भेट होऊ शकली नाही. मात्र, मालटेकडीनजीक फुटपाथवर पेंडॉल टाकून आ.बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केले.
जिल्ह्याभरात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. मात्र, पोलीस प्रशासन हप्ते घेऊन अवैध व्यवसायांना खतपाणी घालत आहे. हेतुपुरस्सरपणे प्रहार कार्यकर्त्यांवर कारवाई केली. ही कारवाई मागे घेण्यात यावी, यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
- बच्चू कडू, आमदार,
अचलपूर मतदार संघ
आ.बच्चू कडू यांच्या आरोपांत तथ्य नाही. आम्ही कायद्या व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कारवाई करतो. प्रहारच्या कार्यकर्त्यांविरोधात गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. त्यामुळे तडीपारीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला आहे. हेतुपुरस्सरपणे ही कारवाई केली नाही.
-लखमी गौतम,
पोलीस अधीक्षक.