व्यावसायिकांचा ‘ब्रेक द चेन’ विरोधात एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:12 IST2021-04-10T04:12:28+5:302021-04-10T04:12:28+5:30
तहसीलदारांना निवेदन, दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी चांदूर बाजार : अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची परिस्थिती नियंत्रणात असतानाही राज्य शासनाने ...

व्यावसायिकांचा ‘ब्रेक द चेन’ विरोधात एल्गार
तहसीलदारांना निवेदन, दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी
चांदूर बाजार : अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची परिस्थिती नियंत्रणात असतानाही राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’च्या नावावर व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. या नवीन नियमाने आधीच भरडून गेलेल्या तालुक्यातील कापड व्यावसायिकांना तसेच दुकानातील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे सदर नवीन नियमावली रद्द करून दुकाने उघडण्याची मागणी तालुक्यातील कापड, कटलरी, सराफा, मोबाईल असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. दुकाने उघडण्याचे आदेश देण्याची मागणी व्यावसायिकांनी निवेदनात केली आहे.
दोन महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील सर्वच व्यावसायिक आधीच त्रस्त झाले आहे. अशात राज्य शासनाने ब्रेक द चेनच्या नावावर अंशत: सुरू असलेली कापड दुकाने, सराफा, मोबाईल, कटलरी, तसेच अनेक व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय दिला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने व्यावसायिकांना विहित मुदतीत दुकाने उघडण्याची परवानगी होती. यामुळे जिल्ह्यातील व्यापारी व नागरिकांनी प्रशासनाला दिलेल्या साथीमुळे जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक रोखण्यात मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले आहे.
अशात जिल्ह्यात रुग्णसंख्या नियंत्रणात असतानासुद्धा राज्य शासनाने लावलेले ब्रेक द चेनची नवीन नियमावली व्यापारी आत्महत्येचे कारण ठरू शकत असल्याचे चित्र सध्या जिल्हाभर निर्माण झाले आहेत. राज्य शासनाचा या नवीन नियमावलीत ७० टक्के व्यावसायिकांना मुभा देण्यात आली आहे. मात्र तिसऱ्यांदा लॉकडाऊनची झळ सोसणाऱ्या कापड, सराफा, मोबाईल, कटलरी व्यावसायिकांना दुकाने उघडण्यास मुभा देण्यात आली नाही. यामुळे सदर व्यावसायिक तसेच त्यांच्या दुकानात काम करणारे मजूर वर्गांवर उपासमारीची वेळ आली आहे. यावर शासनाने त्वरित निर्णय घेऊन दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी चांदूर बाजार कापड असोसिएशन, सराफा, कटलरी, मोबाईल असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. याबाबत मुख्याधिकारी पराग वानखडे व तहसीलदार धीरज स्थूल यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विलास देशमुख, सुदेश भेले, कपिल मोहोड, राजेश कोठारी, सुधीर अग्रवाल, विवेक मोहोड, तिखिले, व्यापारी व कर्मचारी उपस्थित होते.