११ महिन्यांत चार मातामृत्यू, २०० बालमृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:13 IST2017-12-15T23:13:05+5:302017-12-15T23:13:47+5:30
यंदा जिल्हा स्त्री रुग्णालयात यंदा ११ महिन्यांत चार मातामृत्यू व २०० बालमृत्यू झाल्याची नोंद आहे.

११ महिन्यांत चार मातामृत्यू, २०० बालमृत्यू
वैभव बाबरेकर ।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : यंदा जिल्हा स्त्री रुग्णालयात यंदा ११ महिन्यांत चार मातामृत्यू व २०० बालमृत्यू झाल्याची नोंद आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण घटल्याचे दिसून येत आहे. डफरीन रुग्णालयातील आरोग्यसेवेत सुधारणांचा हा प्रभाव आहे.
जिल्ह्यातील गोरगरीब नागरिकांना योग्य आरोग्यसेवा पुरविण्यासाठी शहरात शासकीय रुग्णालये आहेत. ती कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असायचे. अनेकदा डॉक्टर व परिचारिकांवर हलगर्जीचे आरोप लागत होते. २०१७ मध्ये तुरळक घटनांवरून डॉक्टरांवर आरोप करण्यात आल्याचे आढळून आले आहे. एप्रिल २०१६ ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीत जिल्हा स्त्री रुग्णालयात १८ हजार ३७ महिला विविध उपचारासाठी दाखल करण्यात आल्या. त्यापैकी ७ हजार ३८१ महिला प्रसूत झाल्यात. त्यांनी गोंडस बाळांना जन्म दिला. यामध्ये ४ हजार ३६२ महिलांची सामान्य प्रसूती झाली, तर २ हजार ६०६ महिलांचे सिझेरियन झाले. डफरीनमधील सुविधाजनक वातावरण व आरोग्य सेवेसंदर्भात पुरविल्या गेलेल्या सुविधांमुळे यंदाचे माता व बालमृत्यूचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असल्याचे दिसून येत आहे.
पाच वर्षांची आकडेवारी
२०१३-१४ मध्ये ९ हजार ९३८ महिला प्रसूत झाल्या. १३ मातामृत्यू व ५०७ बालमृत्यू झाले. २०१४-२०१५ मध्ये १० हजार ७२२४ महिला प्रसूत झाल्या. ७ मातामृत्यू व ३१८ बालमृत्यू झाले. २०१५-१६ मध्ये ११ हजार ८५ महिला प्रसूत झाल्या. ६ मातामृत्यू व १३२ बालमृत्यू झालेत. २०१६-२०१७ मध्ये १० हजार ४९२ महिला प्रसूत झाल्या. ६ मातामृत्यू व १९८ बालमृत्यू झाले.
दररोज अडीचशे रुग्णांचा ओघ
डफरीन रुग्णालयात सहा वॉर्ड व २०० खाटांची व्यवस्था आहे. मात्र, दररोज अडीचशे रुग्णांचा येतात. त्यामुळे आरोग्य सेवा पुरविण्यात डॉक्टर व परिचारिकांची दमछाक होते. अनेकदा एकाच बेडवर दोन रुग्णांवरसुद्धा उपचार करावे लागते.