मृगाचा हत्ती, चित्राची म्हैस शेतकर्यांना यंदा तारणार
By Admin | Updated: May 25, 2014 23:13 IST2014-05-25T23:13:29+5:302014-05-25T23:13:29+5:30
पावसाचा अंदाज नेहमीच पंचांगकर्ते ठरवितात. याच अंदाजावर शेतकरी विश्वास ठेवून शेतात पेरणी करतात. खरीप हंगामात या नक्षत्रात असलेले वाहन शेतकर्यांच्या जीवनात सुख-दु:खाचे चक्रव्यूह सुरू ठेवते.

मृगाचा हत्ती, चित्राची म्हैस शेतकर्यांना यंदा तारणार
मोहन राऊत - अमरावती पावसाचा अंदाज नेहमीच पंचांगकर्ते ठरवितात. याच अंदाजावर शेतकरी विश्वास ठेवून शेतात पेरणी करतात. खरीप हंगामात या नक्षत्रात असलेले वाहन शेतकर्यांच्या जीवनात सुख-दु:खाचे चक्रव्यूह सुरू ठेवते. यंदा मृग नक्षत्राचे वाहन हत्ती असून चित्रा नक्षत्राचे वाहन म्हैस आहे. या दोन्ही नक्षत्रांमध्ये समाधानकारक पावसाचा अंदाज पंचांगकर्त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या भरघोस उत्पन्नाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गेल्या चार वर्षांत पावसाने खरीप हंगामात अनेकदा दगा दिला. कोणत्या नक्षत्रात किती पाऊस पडणार याविषयी पंचांगकर्त्यांनी आपले अंदाज मांडले. शेतकर्यांनी या अंदाजाप्रमाणे शेतीची मशागत करून पेरणी केली. यापूर्वीच्या हंगामात अनेकेवेळा अतवृष्टीने तर कधी अल्प पावसामुळे शेतकर्यांच्या डोळ्यांत पाणी आणले. मागील वर्षी जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाला. परंतु घरात सोयाबीन पीक येत असताना झालेल्या अतवृष्टीमुळे सोयाबीनला झाडावरच कोंब फुटले आणि उत्पादनात कमालीची घट झाली. यंदा खरीप हंगामात समाधानकारक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने शेतकर्यांनी जमिनीची मशागत पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकर्यांची मदार या खरीप हंगामातील उत्पादनावर असते. मृगाच्या पावसाबद्दलचे हवामान खाते व पंचांगकर्त्यांचे अंदाज खरे ठरले तर यंदा अधिक उत्पादनाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या मनात पुन्हा आशा पल्लवीत झाल्या आहेत.