एकाच जोडणीतून अनेकांना वीजपुरवठा
By Admin | Updated: January 3, 2015 22:55 IST2015-01-03T22:55:05+5:302015-01-03T22:55:05+5:30
शासकीय जागेवर अतिक्रमण करुन वीज जोडणी घेऊन शेजाऱ्यांना भाडे तत्त्वावर वीजजोडणी देण्याचा गोरखधंदा सध्या जोरात सुरु आहे. यावर विद्युत वितरण कंपनी मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.

एकाच जोडणीतून अनेकांना वीजपुरवठा
चांदूरबाजार : शासकीय जागेवर अतिक्रमण करुन वीज जोडणी घेऊन शेजाऱ्यांना भाडे तत्त्वावर वीजजोडणी देण्याचा गोरखधंदा सध्या जोरात सुरु आहे. यावर विद्युत वितरण कंपनी मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.
मागील काही वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, नगरपालिका प्रशासनाच्या जागेवर अतिक्रमण सतत वाढत आहे. या शासकीय जागांवर अनेक दुकाने तसेच घरांचे बांधकाम झाले आहेत. या दुकानांत विद्युत जोडणीसाठी तसेच नळजोडणी घेण्यासाठी संबंधित विभागाची नाहरकत असणे आवश्यक असते. मात्र या शासकीय जमिनीवर कोणतीही परवानगी न घेता अतिक्रमण थाटून विद्युत जोडणीसुध्दा घेतल्याने विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
ज्या विभागाच्या अधिकार क्षेत्रात अतिक्रमण झाले आहे अशा विभागांची नाहरकत पत्राशिवाय विद्युत घेऊन अन्य व्यक्तिला वीज जोडणीतून वीज पुरवठा देणे हे कायद्याने गुन्हा आहे. वीज जोडणीतून इतरांना वीजपुरवठा भाडे तत्त्वावर देण्याचा व्यवसाय सुरु आहे. अनेक विद्युत ग्राहकांनी शासकीय जागेत अतिक्रमण थाटून घर तसेच दुकाने सुरु केली आहे. या शासकीय जागेत अतिक्रमण करणाऱ्या ग्राहकाला नाहरकत देता येत नसून या ग्राहकाला विद्युत जोडणीसाठी मोठ्या प्रमाणात नाहरकत प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे.
स्थानिक नगर पालिकेतर्फे नुकतीच अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली होती. मात्र यामध्ये १० टक्के अतिक्रमण सुध्दा हटविण्यात आले नसून हे अतिक्रमण पूर्वीपेक्षा अधिक वाढले आहे.
या अतिक्रमित अनेक दुकानदारांना नगर पालिकेतर्फे हात ओले करुन तर नगरसेवक आपली वोटबँक वाढविण्यासाठी बेकायदेशीररीत्या नाहरकत देतात. यामुळे या अतिक्रमण व्यावसायिक काही वीज ग्राहकांनी थाटला आहे. तर काहींनी नगरसेवकांना हाताशी बाळगून विद्युत खांबावरुनच सरळ आकोडा टाकून विद्युत पुरवठा घेतलेला आहे. मात्र, विद्युत वितरण कंपनी अशा ग्राहकांवर कोणतीही कारवाई करतांना दिसत नाही.