परतवाड्यात खांबावरून वीजचोरी

By Admin | Updated: June 12, 2015 01:04 IST2015-06-12T01:04:42+5:302015-06-12T01:04:42+5:30

विजेची चोरी करण्यासाठी पथदिव्यांच्या खांबावरून वायर टाकून 'अंडरग्राऊंड' केल्याचा प्रकार परतवाडा शहरात उघडकीस आला

Electricity from the pole in the back wall | परतवाड्यात खांबावरून वीजचोरी

परतवाड्यात खांबावरून वीजचोरी

साटेलोटे : अधिकाऱ्यांचे उत्तर ‘ते माझे काम नाही’
नरेंद्र जावरे ल्ल अचलपूर
विजेची चोरी करण्यासाठी पथदिव्यांच्या खांबावरून वायर टाकून 'अंडरग्राऊंड' केल्याचा प्रकार परतवाडा शहरात उघडकीस आला आहे. यासंदर्भात विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याने सबब ऐकून घेण्याऐवजी उद्धटपणे उत्तर देऊन एकप्रकारे वीजचोराला अभय देण्याचा प्रयत्न केल्याने या चोरीच्या जिवंत विद्युत तारेमुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
परतवाडा-धारणी मार्गावरील गोपालनगर परिसराला लागून झोपडपट्टी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाकडेसुद्धा हाच मार्ग जातो. या रस्त्यावरील विद्युत खांबावरून चोरीचा वीजपुरवठा घेतल्याचे उघडकीस आले.
थेट खांबावर चढून वायर जोडणी करण्यात आली आणि तो वायर खांबाच्या सरळ दिशेने खाली आणून जमिनीत पुरण्यात आला व एका नालीद्वारे झोपडपट्टी परिसरात अवैध विद्युतपुरवठा करण्यात आला. वर्दळीच्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात विद्युत चोरी होत असल्याचा प्रकार वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी वजा संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात येऊ नये याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. वीजचोरीमुळे विद्युत कंपनीला मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. वीजचोरीचा प्रकार परतवाडा शहरासह तालुक्यात राजरोसपणे सुरु आहे. याकडे वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे.

अधिकाऱ्यांचे बेजबाबदारपणा कारणीभूत
वीज चोरी कायद्याने गुन्हा सांगणाऱ्या विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे उद्धट उत्तर वितरण कंपनीची मान शरमेने खाली घालावयास भाग पाडत आहे. जीवघेणा चोरीचा विद्युत पुरवठा सुरू असल्याची माहिती वजा अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी पत्रकारांनी अचलपूर विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र गिरी यांचे दालन गाठले. मात्र ते अमरावती येथे महत्त्वाच्या बैठकीला गेल्याचे सांगण्यात आले. त्यावर कार्यालयीन उपकार्यकारी अभियंता महेश कोकाटे यांना वीजचोरीचा हा प्रकार सांगण्यात आला. मात्र त्यांनीही दुर्लक्ष केले. पुन्हा त्यांना वीज चोरीसंदर्भात माहिती देत हा प्रकार जीवघेणा असल्याने कारवाई करण्याचे सांगितले असता सदर तक्रार आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगा असे उत्तर दिले. कार्यकारी अभियंता नसल्यामुळे सदर बाब आपल्या निदर्शनास आणून देण्याचे सांगितल्यावरसुद्धा महेश कोकाटे यांनी अधिनस्त कर्मचाऱ्यांना बोलावून वीज चोरीचा प्रकार पाहण्याची तसदी घेतली नाही.

कुठे गेले भरारी पथक ?
विद्युत खांबावरील पथदिवे दुरूस्तीसह इतर कामांसाठी कर्मचारी विद्युत खांबावर चढत असताना मुख्य मार्गावरील विद्युत खांबावरून होणारी विद्युत चोरी दिसू नये, याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. कार्यकारी अभियंता राजेंद्र गिरी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

विश्रामगृह मार्ग
बिच्छन नदीच्या पात्रालगत असलेला हा मार्ग प्रमुख विश्रामगृहाकडे जातो. तेथील रस्त्यावर मंत्रालयातील अधिकारी व मंत्रीद्वय मात्र विश्रामगृहावर थांबत असल्याने अगदी रस्ता खोदून चोरीचा विद्युतपुरवठा जीवघेणा ठरत आहे.

Web Title: Electricity from the pole in the back wall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.