दीड हजार शाळांना वीज बिलांचा ‘शॉक’
By Admin | Updated: November 9, 2014 22:25 IST2014-11-09T22:25:56+5:302014-11-09T22:25:56+5:30
जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खासगी माध्यमिक शाळांना कोणत्याही प्रकारचे उत्पन्न नसताना या शाळांची वीज बिले व्यावसायिक दराने आकारली जातात. त्यामुळे दीड हजार शाळांना वीज बिलांचा शॉक बसला आहे़

दीड हजार शाळांना वीज बिलांचा ‘शॉक’
मोहन राऊत - अमरावती
जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खासगी माध्यमिक शाळांना कोणत्याही प्रकारचे उत्पन्न नसताना या शाळांची वीज बिले व्यावसायिक दराने आकारली जातात. त्यामुळे दीड हजार शाळांना वीज बिलांचा शॉक बसला आहे़ परिणामी गत पंधरवाड्यात आठशे शाळांची बत्ती गुल झाली आहे़
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा १ हजार ५९९ असून २४ माध्यमिक शाळा आहेत. खासगी शाळांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे़ या शाळांना व्यावसायिक दराने वीजपुरवठा केला जात आहे़ ३५० युनिटच्यावर जादा दराने वीज बिल आकारले जात आहे. शाळास्तरावर वीज बिले भरण्याची तरतूद नाही़ त्यामुळे मुख्याध्यापक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. दरमहा भरमसाठ रकमेमुळे जिल्ह्यातील १२०० शाळांची वीज बिले दोन महिन्यांपासून थकीत आहेत. वीज मंडळाने या शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू केले आहे़ आतापर्यंत वीज मंडळाने तब्बल ८०० शाळांची बत्ती गूल केली आहे़
बहुतांश शाळांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध आहेत. संगणकाच्या माध्यमातून शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम, इ-लर्निंग सुविधा उपलब्ध झाल्या आहेत़ परंतु शाळा ही अनुत्पादित संस्था असतानाही तसेच कोणताही व्यवसायिक भाग नसताना वीज कंपनी व्यवसायिक दराने वीज बिलांची आकारणी करीत आहे़ इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग असलेल्या शाळांचे अनुदान बंद करण्यात आल्याने या शाळांना जादा बिले भरताना अडचणी येतात.