विषय समिती सभापतीची निवडणूक होणार बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:12 IST2021-03-20T04:12:38+5:302021-03-20T04:12:38+5:30
अमरावती : जिल्हा परिषदेच्या शिक्षण व बांधकाम विषय समितीच्या रिक्त झालेल्या सभापती पदासाठीची निवडणूक २० मार्च रोजी होत ...

विषय समिती सभापतीची निवडणूक होणार बिनविरोध
अमरावती : जिल्हा परिषदेच्या शिक्षण व बांधकाम विषय समितीच्या रिक्त झालेल्या सभापती पदासाठीची निवडणूक २० मार्च रोजी होत आहे. मात्र, ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. केवळ औपचारिकता बाकी असल्याचे जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण व बांधकाम समिती सभापती प्रियंका दगडकर यांचे १८ जानेवारी रोजी निधन झाले. परिणामी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ चे कलम ९० नुसार विषय समितीच्या सभापतीचे अधिकारपद नैमित्तिकरीत्या रिकामे झाल्याने विषय समिती सभापती क्र. ३ हे पद कलम ८३ (१-अ) मधील तरतुदीच्या अनुषंगाने झेडपीच्या विशेष सभा बोलवून भरले जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार निवडणुकीची प्रकिया पार पडली. जिल्हा परिषदेतील सत्ताधारी पक्षाकडून नवीन सभापतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय व्यूहरचना जवळपास ठरल्याची माहिती आहे. यात नवीन सभापतीच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असले तरी निवडणुकीची प्रक्रिया नियमानुसार होणार आहे. त्यामुळे शनिवारीच सभापतीची निवडणूक होणार की बिनविरोध निवडून देणार याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.