हिवाळी अधिवेशनापूर्वीच पालिका निवडणूक प्रक्रिया

By Admin | Updated: October 9, 2016 01:09 IST2016-10-09T01:09:06+5:302016-10-09T01:09:06+5:30

नगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा एकंदरित वेग पाहता, राजयभरातील नगरपालिका व नगर पंचायतींच्या ...

Election process of municipal elections before winter session | हिवाळी अधिवेशनापूर्वीच पालिका निवडणूक प्रक्रिया

हिवाळी अधिवेशनापूर्वीच पालिका निवडणूक प्रक्रिया

नोव्हेंबरला मुहूर्त : तयारीला आलाय वेग
चांदूरबाजार : नगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा एकंदरित वेग पाहता, राजयभरातील नगरपालिका व नगर पंचायतींच्या निवडणुका निधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. परिणामी नोव्हेंबर अखेरपर्यंत त्या घेतल्या जाऊ शकतात. महापालिका व जिल्हा परिषद फेब्रुवारीमध्येच होऊ शकतात.
राज्यभरातील १९५ पालिकांची मुदत डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात संपत आहे. या पार्श्वभूमिवर नगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम नोव्हेंबर अखेरपर्यंत पार पडला जाण्याची दाट शक्यता आहे. ५ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणारे हिवाळी अधिवेशन व ६ डिसेंबर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीप्रित्यर्थ होणारी गर्दी लक्षात घेता नोव्हेंबरच्या शेवटापर्यंत नगरपालिका निवडणुकांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची योजना निवडणूक विभागाकडून आखण्यात आल्याची माहिती आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून, पोलीस व इतर शासकीय यंत्रणांकडून चाचपणी करण्यात येत आहे.
दिवाळीनंतर कोणताही सण किंवा राजकीय कार्यक्रम नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा फारसा प्रश्न निर्माण होणार नाही, असा अंदाज निडणूक आयोगाकडून लावला जात आहे. तसेच महानगरपालिकांची मुदत मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, तर जिल्हा परिषदांची मुदत दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात संपत आहे. फेब्रुवारीच्या १० तारखेनंतर बारावीची परीक्षा व मार्चमध्ये दहावीची परीक्षा सुरू होत आहे, तसेच फेब्रुवारीच्या सुरूवातीलाच मुंबई, ठाणे, पुण्यासह एकूण १० नगरपालिकांच्या निवडणुका होतील, त्याच पाठोपाठ आठवडाभराच्या अंतराने जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

सत्ताधारी भाजपचे निवडणुकीवर पूर्ण लक्ष
पालिकांमध्ये आजच्या घटकेला बहुतांश ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रादी काँग्रेसची सत्ता आहे. यावेळी राज्यात सत्ता असल्याने भाजप यंदा या निवडणुकीत सर्वच ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठीच यावर्षीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाची थेट निवडणूक व दोन सदस्यीय प्रभाग रचना पद्धती तयार केली आहे. यात भाजप किती यशस्वी होते हे येणारा काळच सांगू शकेल. हे जरी खरे असले तरी यात भाजलाच यश मिळेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास आहे. परंतु जनतेने मधून थेट निवडून येणारा अध्यक्ष पुढे विधानसभेसाठी आपल्यालाच स्पर्धक ठरू शकतो, या भीतीपोटी भाजपमधील काही मंत्री व आमदारांचा थेड निवडणूक पद्धतीला अंतर्गत विरोध आहे. त्यामुळे ठिकठिकाणी भाजपचाच अध्यक्ष निवडून यावा, यासाठी निवडणूक प्रचारावर मुख्यमंत्री स्वत: लक्ष ठेवून असल्याचे कळते

Web Title: Election process of municipal elections before winter session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.