सव्वा कोटीच्या उधारीवर ग्रामपंचायतींची निवडणूक
By Admin | Updated: June 26, 2015 00:24 IST2015-06-26T00:24:36+5:302015-06-26T00:24:36+5:30
जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ९३ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक होत आहेत. यासाठी ग्रामविकास विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास १२ लाख ९० हजारांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

सव्वा कोटीच्या उधारीवर ग्रामपंचायतींची निवडणूक
ग्रामविकास विभागाचे गाजर : बुधवारी मिळाले १२ लाख ९० हजार
गजानन मोहोड अमरावती
जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ९३ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक होत आहेत. यासाठी ग्रामविकास विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास १२ लाख ९० हजारांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, एप्रिल महिन्यात झालेल्या ५३६ ग्रामपंचायतींचा १ कोटी ३२ लाखांचा निवडणूक निधी शिल्लक आहे. त्यामुळे पूर्वीची उधारी शिल्लक असताना पुन्हा निवडणूक घेण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर आली आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी ३० एप्रिलपूर्वी प्रलंबित निधी व ग्रामपंचायत निवडणुकांना लागणारा निधी देण्याचे आश्वासन ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांनी तहसीलदार संघटनेला दिले होते. यापैकी ३१ लाख ९० हजारांचा निधी मुदतपूर्व उपलब्ध करण्यात आला होता.
तहसीलदारांची होणार कसरत
अमरावती : ग्रामविकास विभागाने हात आखुडते घेतले. मागच्या निवडणुकीच्या वेळी प्रलंबित निधीसाठी तहसीलदार संघटनेनी ग्रामपंचायत निवडणुकीची अधिसूचना जारी न करण्याचा पवित्रा घेतला होता. परिणामी ग्रामविकास विभाग तोंडघसी पडला होता. या पार्श्वभूमिवर यावेळी मात्र ग्रामपंचायत निवडणुकीची अधिसूचना जारी केली त्याच दिवशी म्हणजे २३ जून रोजी निवडणूक निधी उपलब्ध करून तहसीलदार संघटनेला गोंजारण्याचा प्रयत्न ग्रामविकास विभागाने केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी प्रति मतदार ४० रूपये किंवा प्रति मतदार केंद्र १० हजार रूपये अशी मागणी या निवडणुकांसाठी करण्यात आली आहे. यासाठी ज्या तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. त्या तालुक्याच्या तहसीलदाराकडून निवडणुकांसाठी येणारा अपेक्षित खर्चाचा अहवाल मागविण्यात आलेला आहे. मात्र निधी फक्त १२ लाख ९० हजार रूपये देण्यात आलेला आहे.
त्यामुळे पूर्वीच्या १ कोटी ३२ लाख रुपयांची उधारी व या निवडणुकांसाठी होणारी पुन्हा उधारीमध्ये निवडणूका पार पाडण्याची कसरत तहसीलदारांना करावी लागणार आहे.