अचलपूर बाजार समिती निवडणूक, शांततेत मतदान
By Admin | Updated: July 27, 2015 00:26 IST2015-07-27T00:26:47+5:302015-07-27T00:26:47+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ जागांकरिता रविवारी शांततेत मतदान झाले. याची टक्केवारी ९५.२५ एवढी आहे. आठ मतदान केंद्रांवरुन दोन हजारांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

अचलपूर बाजार समिती निवडणूक, शांततेत मतदान
आज मतमोजणी : दिग्गजांचे भाग्य मतपेटीत बंद
नरेंद्र जावरे अचलपूर
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ जागांकरिता रविवारी शांततेत मतदान झाले. याची टक्केवारी ९५.२५ एवढी आहे. आठ मतदान केंद्रांवरुन दोन हजारांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ जागांसाठी ४१ उमेदवारांचे भाग्य रविवारी सायंकाळी मतपेटीत बंद झाले. सोमवार २७ जुलै रोजी सकाळी ९ वाजतापासून बाजार समितीच्या चिली गोदामात मतगणना होणार आहे.
सेवा सहकारी सोसायटीच्या ६३९ पैकी ६३४ मतदारांनी मतदान केले. तर ग्रामपंचायत मतदारसंघातील ६२२ मतदारांपैकी ६१६ मतदारांनी मतदान केले. अडत्या व्यापारी मतदारसंघातील ४४५ पैकी ४२१ मतदारांनी तर हमाल मापारी मतदारसंघातील ५६९ मतदारांपैकी ४९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जवळपास सर्वच मतदारसंघांतील मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केल्याने बाजार समितीची निवडणूक चुरशीची झाल्याचे चित्र आहे. रविवारी झालेल्या बाजार समिती निवडणुकीसाठी परतवाडा येथे बाजार समितीच्या वेगवेगळ्या दालनात चार मतदान केंद्र ठरविले होते. पथ्रोट व असदपूर येथे प्रत्येकी दोन असे एकूण आठ मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. पन्नासच्या जवळपास कर्मचाऱ्यांनी या मतदान कार्यक्रमात सहभाग घेतल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेश भुयार यांनी सांगितले.