‘प्रेमा’साठी तरूणाईचे कल्पक फंडे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2016 00:20 IST2016-02-09T00:20:35+5:302016-02-09T00:20:35+5:30
‘प्यार किया कोई चोरी नही की...छुप-छुप आहें भरना क्या...’ असे म्हणत अश्रू ढाळत बसणारी आजची पिढी नक्कीच नाही तर ...

‘प्रेमा’साठी तरूणाईचे कल्पक फंडे !
व्हॅलेंटाईन वीक : पोलिसांच्या हातावरही देताहेत तुरी, बाजारपेठेवर चढलाय प्रेमज्वर
संदीप मानकर अमरावती
‘प्यार किया कोई चोरी नही की...छुप-छुप आहें भरना क्या...’ असे म्हणत अश्रू ढाळत बसणारी आजची पिढी नक्कीच नाही तर ‘व्हॅलेंटाईन वीक’ मध्ये आठवडाभरात या पिढीचे प्रेम अनेक टप्पे गाठून निर्णयाप्रत (?), नाहीच जुळले तर चक्क ब्रेकअपपर्यंत सुध्दा येते. त्यांच्या प्रेमाचा वेग सोशल मीडिया, व्हॉट्स अॅप, फेसबुकही वाढवू लागले आहे. मात्र, सध्या शहरात तैनात पोलिसांचा ससेमिरा चुकवून ‘प्यार को अंजाम’ देणे काही सोपे नाही. पण, हार मानेल ती तरूणाई कसली? पोलिसांची आणि पालकांची नजर चुकवून प्रेम करण्यासाठी तरूणाईने शोधून काढलेले विविध फंडे मोठे रंजक आहेत. तरूणांच्या कल्पकतेचे विविध पैलूच व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्ताने समोर येत आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
व्हॅलेंटाईन वीक रविवारपासून सुरू झाला. ‘रोझ डे’म्हणजे आवडत्या मित्राला किंवा मैत्रिणीला फूल देऊन तिचे /त्याचे मन वळविण्याची सुवर्ण संधी. पण, फूल द्यायचे तर एकांत हवा. पण, एकांत शोधताना तरूणाईच्या नाकी नऊ आले. त्यामुळे गर्दी नसलेल्या रस्त्याच्या कडेला, बंद दुकाने, घरांच्या आडोशाला, शहरातील काही उद्यानांमध्ये हातात हात घालून फिरणारी जोडपी दिसून आली. निवांत क्षण मिळत नसल्याने लोकांची भिड न बाळगता अनेक तरूणांनी रस्त्यांवरच बिनधास्तपणे भावनांना वाट मोकळी करून दिलेली आढळली.
सोमवारी व्हॅलेंटाईन वीकमधील महत्त्वाचा दिवस म्हणजे ‘प्रपोज डे’ होता. मनातील भावना व्यक्त करण्याचा परवानाच या निमित्ताने मिळतो. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी दुचाकींवर ‘डबल सीट’ जोडपी आढळून आली आहेत.
शहरातील काही प्रमुख ‘प्रेमस्थळे’
आपापल्या व्हॅलेंटाईनला प्रपोेज करण्यासाठी तरूणाईने शहरातील प्रमुख ‘प्रेमस्थळां’नाच पसंती दिली. त्यात नागपूर राज्य महामार्गावरील वेलकम पॉइंट, वडाळी, छत्रीतलाव उद्याने, मार्डी रोड, पोहरा मार्ग, भानखेड मार्गावर, शहरातील सिनेमागृहे, प्रशांत नगर उद्यान, मालटेकडी परिसर, तरूण-तरूणींची गर्दी दिसून आली. जंगल भागाकडे जाणाऱ्या दुचाकींची संख्या व्हॅलेंटाईन वीकनिमित्त वाढलेली दिसून येत आहे.
विद्यापीठ मार्गावर प्रेमवीरांची झुंबड
शहरातील वर्दळीपासून लांब, एकांताच्या शोधात तरूणाईची वर्दळ विद्यापीठ ते मार्डी मार्गावर वाढल्याचे दिसते. दुचाकीने या मार्गावर ‘लाँग ड्राईव्ह’ करतानाच अनेक गैरप्रकार देखील आढळून येतात. मागील वर्षी पोलिसांनी या मार्गावर नाकाबंदी करून तरूणांवर लगाम घातला होता.
पोलीस, पालकांची नजर चुकविण्याचे फंडे
तरूणाईच्या बेबंदशाहीवर नजर ठेवण्याकरिता पोलीस डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत आहेत. शिवाय पालकांचाही वॉच असतोच अशा स्थितीत तरूणाईने देखील अनेक फंडे शोधून काढले आहेत. भ्रमणध्वनी आणि फेसबूक व व्हॉट्सअॅपने ही बाब अधिकच सोपी केली आहे.
घरून निघताना वेगळा स्कार्फ वापरणे, बाहेर निघाल्यानंतर बदलून टाकणे.
दुचाकीवर मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत येणे, निर्धारित स्थळी पोहोचल्यानंतर आपापल्या बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंडच्या गाडीवर बसून पुढे जाणे.
प्रियकर, प्रेयसीचा फोन आल्यास कोडवर्डचा उपयोग करून संवाद साधणे.
ट्यूशनच्या नावाने घरून निघणे अन् प्रियकर/प्रेयसीसमवेत बाहेर हुंदडणे
व्हॉट्सअॅपवरून सांकेतिक संवाद
अहमदनगरच्या गुलाबाला विशेष मागणी
रविवारी व्हॅलेंटाईन वीकमध्ये ‘रोझ डे’ साजरा करण्यात आला. तसेही गुलाबाचे फूल प्रेमासाठी सर्वात उत्तम भेट. त्यामुळे गुलाबाला सतत मागणी असते. अंबानगरीत खास अहमदनगरहून गुलाबाची आवक झाली आहे. या गुलाबांना विशेष पसंती आहे. हा गुलाब २० ते २५ रूपयांना विकला जातो.
आकर्षक भेटवस्तूंनी बाजारपेठ सजली
व्हॅलेंटाईनला गिफ्ट दिल्या जाणाऱ्या वस्तुंनी बाजारपेठ सजली आहे. राजकमल चौक, जयस्तंभ चौक, गांधी चौक, गाडगेनगर येथील दुकानांमध्ये विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आकर्षक ग्रिटींग्स, टेडी, वेगळ्या लुकचे ड्रेस मटेरिअल्स, चॉकलेट्स, किचेन्स आणि डिओड्रंट्स, मुलींना दिल्या जाणाऱ्या इमिटेशन ज्वेलरींनी बाजारपेठ सजली आहे. यातून या प्रेम सप्ताहात लाखोंची उलाढाल अपेक्षित आहे.