निवृत्त पोलिसाने हडपली वृद्ध काकूची शेतजमीन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:22 IST2021-02-05T05:22:33+5:302021-02-05T05:22:33+5:30
धामणगाव रेल्वे : वर्धा येथील एका निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याने वृद्ध काकूची तब्बल ४ हेक्टर ७४ आर शेताची ...

निवृत्त पोलिसाने हडपली वृद्ध काकूची शेतजमीन !
धामणगाव रेल्वे : वर्धा येथील एका निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याने वृद्ध काकूची तब्बल ४ हेक्टर ७४ आर शेताची खरेदी स्वत:च्या नावाने करून घेतली असल्याचा धक्कादायक प्रकार येथे पुढे आला आहे. याप्रकरणी दत्तापूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे तथा महसूलकडेही फिर्याद नोंदविण्यात आली.
तालुक्यातील झाडा येथील सुशीला गुळकरी (७५) या वृद्धेच्या पतीचे चाळीस वर्षांपूर्वी निधन झाले. मूलबाळ नसल्याने त्या एकट्याच राहून मालकीच्या ४ हेक्टर ७४ आर शेतजमिनीतून उत्पादन घेऊन उदरनिर्वाह करीत होत्या. ३१ डिसेंबर २०२० रोजी रोजी वर्धा येथे राहणाऱ्या, निवृत्त पोलीस कर्मचारी पुतण्याने सुशीला गुळकरी यांना धामणगाव येथील दुय्यम निबंधक खरेदी-विक्री कार्यालयात नेऊन त्यांची ४ हेक्टर ७४ आर शेतजमीन स्वत:च्या नावाने खरेदी करून घेतली. त्याबदल्यात वर्धा शाखेच्या एका बँकेचे पंधरा लाखांचे दोन धनादेश व चार लाख रुपये नगदी दिल्याचे खरेदीखतात लिहून घेतले. प्रत्यक्षात मात्र आपल्याला एक रुपयाही मिळाला नसल्याने सुशीला गुडकरी यांनी त्याविरोधात दत्तापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. आपल्याकडून जबरदस्तीने खरेदीखतावर स्वाक्षरी घेतली असल्याची तक्रार सुशीला गुळकरी यांनी तहसील कार्यालयातदेखील केली आहे.
कोट
संबंधित खरेदी-विक्री व्यवहारात दिलेल्या धनादेशाची रक्कम विक्रेत्याच्या खात्यात जमा न झाल्यास ही खरेदी अवैध ठरविण्यात येते. सदर प्रकरणात पूर्ण चौकशी झाल्याशिवाय तलाठ्यांनी नोंद घेऊ नये, असे आदेश दिलेत.
- गौरवकुमार भळगाटिया, तहसीलदार, धामणगाव रेल्वे