मंत्रोच्चारात झाले एकवीरा मंदिराचे कळसारोहण
By Admin | Updated: May 7, 2015 00:11 IST2015-05-07T00:11:39+5:302015-05-07T00:11:39+5:30
मंत्रोच्चाराचा गजर, भाविकांची अलोट गर्दी, विविध धार्मिक अनुष्ठानांची रेलचेल अशा पवित्र व धीरगंभीर वातावरणात ..

मंत्रोच्चारात झाले एकवीरा मंदिराचे कळसारोहण
विविध कार्यक्रम : पाच हजार भाविकांनी घेतला महाप्रसाद, मंदिराच्या पुनर्निर्माण कार्याचा अंतिम टप्पा
अमरावती : मंत्रोच्चाराचा गजर, भाविकांची अलोट गर्दी, विविध धार्मिक अनुष्ठानांची रेलचेल अशा पवित्र व धीरगंभीर वातावरणात शहरातील प्रसिध्द एकवीरा देवी मंदिराचा कळसारोहण सोहळा गुरूवारी पार पडला. गेल्या १० वर्षांपासून सुरू असलेल्या एकवीरा मंदिराच्या पुनर्निर्माण कार्याची या कळसारोहण समारोहानंतर विधिवत सांगता झाली. गोविंद देव गिरी महाराजांच्या शुभहस्ते सकाळी ८ वाजता हा समारोह आटोपला.
याप्रंसगी आई एकवीरेच्या दर्शनाकरिता भक्तांची मांदियाळी होती. कार्यक्रमापश्चात आयोजित महाप्रसादाचा तब्बल पाच हजार भाविकांनी लाभ घेतला. कळसारोहण सोहळ्याच्या निमित्ताने ४ मेपासून मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. बुधवारी सकाळी ८ वाजता पूजा व होमहवन करून गोविंद देव गिरी महाराज यांच्या हस्ते कळसास्थापना करण्यात आली. त्यानंतर श्री जनार्दन स्वामी मंदिराच्या शिखरावर येलकी येथील मुरलिधर महाराजांच्या हस्ते कळसारोहण करण्यात आले. आतषबाजीसुध्दा करण्यात आली. अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठाचे मठाधिपती जितेंद्रनाथ महाराज उपस्थित होते. मदिराच्या पुनर्निर्माणासाठी सहयोग देणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. संस्थानचे अध्यक्ष रमेश गोडबोले, सचिव दीपक सब्जीवाले, उपाध्यक्ष शेखर भोंदू, शेखर कुळकर्णी, राजेंद्र टेंबे, शैलेश वानखडे, कारंजकर उपस्थित होते.
सेवाभावी पदाधिकाऱ्यांचा गौरव
एकवीरा देवी मंदिरातील सेवाभावी कार्याबद्दल संतांनी पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. मंदिराचे पुनर्निर्माणकार्य करणारे उमेश सोमपुरीया, संस्थाध्यक्ष रमेश गोडबोले, दीपक सब्जीवाले तसेच माजी उपाध्यक्ष स्व. वसंत कुळकर्णी यांच्या स्मृतीला उजाळा देत गोविंद देव गिरी महाराजांनी (किशोरजी व्यास) शेखर कुळकर्णींचा सत्कार केला. अंबादेवीतील आरती मंडळांनी दिलेल्या सेवेबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.