अठराविश्वे दारिद्र्यावर मात; मूकबधिर माता-पित्यांचे फेडले पांग
By Admin | Updated: June 8, 2015 00:32 IST2015-06-08T00:32:43+5:302015-06-08T00:32:43+5:30
इयत्ता दहावी, बारावी अशा दोन्ही परीक्षेत अव्वल ठरल्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रतेसाठी ...

अठराविश्वे दारिद्र्यावर मात; मूकबधिर माता-पित्यांचे फेडले पांग
धामणगाव रेल्वे : इयत्ता दहावी, बारावी अशा दोन्ही परीक्षेत अव्वल ठरल्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रतेसाठी घेण्यात आलेल्या एमएच-सीईटी या परीक्षेत २०० पैकी १८२ गुण घेऊन ‘त्याने’ आपल्या अंध माता-पित्यांचे पांग फेडले.
ही यशोगाथा आहे हृषीकेश रवींद्र देशमुख या जिद्दी विद्यार्थ्याची. येथील सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल मधून इयत्ता दहावीच्या परीक्षेत त्याने नेत्रदीपक यश मिळविले. चांदूररेल्वे तालुक्यातील येरड येथील मूळ रहिवासी असलेले हृषीकेशचे वडील रवींद्र व आई संध्या दोघेही मूकबधिर आहेत. केवळ हातवारे आणि इशारे हीच त्यांची बोलीभाषा. त्यात घरात अठराविश्वे दारिद्र्य. परंतु अशाही स्थितीत या दाम्पत्याची मोठी मुलगी पायल पुणे येथील एका महाविद्यालयात आयटीचे शिक्षण घेत आहे. आता ऋषिकेशने उत्तुंग यश मिळवून माता-पित्यांचे पांग फेडले.
मूकबधिर रविंद्र यांनी मुंबई येथील मूकबधिर आयटीआयमध्ये वायरमनचा कोर्स केला. नंतर देवगाव येथील साखर कारखान्यात नोकरीसाठी आले. येथे पाच वर्षे झाल्यानंतर हा कारखाना बंद पडला़ त्यांनी जिद्द न सोडता हातगाव येथे साखर कारखान्यात नोकरी केली. परंतु काही कारणास्तव ही नोकरीदेखील सुटली.आर्थिक अस्थैर्य असूनही त्यांनी दोन्ही मुलांना शिक्षण दिले. हृषीकेश म्हणतो सेवानिवृत्त शिक्षक असलेले आजोबा गुणवंत हांडे यांचा त्याच्या यशात मोलाचा वाटा आहे़ हृषीकेशने बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेत ६५० पैकी ६०९ गुण मिळाले आहे़ त्याच्या यशात राजेंद्र जोशी यांचा मोलाचा वाटा आहे. दहावीत संस्कृतमध्ये त्याने पूर्ण पैकी पूर्ण गुण मिळविले. आता सीईटी परीक्षेत २०० पैकी १८२ गुण प्राप्त केले आहे़ ओबीसी गटातून त्याने ९९ वा क्रमांक तर सामान्यांमधून ४३२ वा क्रमांक घेतला आहे़ आपल्या मुलाचे यश पाहून मुकबधिर देशमुख दाम्पत्याला आनंदाश्रू दाटून आले. शब्दांची भाषा ऐकू-बोलू न शकणाऱ्या या दाम्पत्याचा डोळ्यांतून वाहणारे पाणीच त्यांची कहाणी कथन करण्यास पुरेसे होते. उत्साह आणि आनंदाच्या भरात रवींद्र यांनी हातवारे करून आपण आपल्या मुलाला डॉक्टर बनविणार, हे सांगितले. गरीब परिस्थिती मूकबधिर माता-पित्यांचे अहोरात्र परिश्रम आणि स्वत:ची जिद्द या बळावर हृषीकेशने मिळविलेले यश खरेच नेत्रदीपक आहे. (तालुका प्रतिनिधी)