नुकसान भरपाईसाठी संत्रा उत्पादकांची आठ वर्षांपासून पायपीट

By Admin | Updated: August 13, 2014 23:35 IST2014-08-13T23:35:25+5:302014-08-13T23:35:25+5:30

मोर्शी तालुक्यातील सावरखेड (पिंगळाई) येथील शेतकरी एकनाथ ठवळी यांच्या शेतात २००७ मधील अतिवृष्टीमुळे पाणी साचले होते. त्यामुळे संत्रा झाडे खराब होऊन आठ लाखांचे नुकसान झाले.

For eight years, the orange growers have to pay for the loss | नुकसान भरपाईसाठी संत्रा उत्पादकांची आठ वर्षांपासून पायपीट

नुकसान भरपाईसाठी संत्रा उत्पादकांची आठ वर्षांपासून पायपीट

नेरपिंगळाई : मोर्शी तालुक्यातील सावरखेड (पिंगळाई) येथील शेतकरी एकनाथ ठवळी यांच्या शेतात २००७ मधील अतिवृष्टीमुळे पाणी साचले होते. त्यामुळे संत्रा झाडे खराब होऊन आठ लाखांचे नुकसान झाले. सदर नुकसानाची भरपाई देण्यासाठी विभागीय आयुक्तांनी कृषी पणन विभागाच्या मुख्य सचिवांना अहवाल दिला. परंतु त्यावर कार्यवाही झाली नाही. आठ वर्षांपासून शेतकरी ठवळी संबंधीत कार्यालयात पायपीट करीत असून अद्यापही त्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याने त्यांनी अखेर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
सावरखेड येथील शेतकरी एकनाथ ठवळी व मुलगा संदीप ठवळी यांचे पाझर तलावालगत शेत सर्व्हे नं. २३२ व २३३ शेत असून त्यामध्ये संत्रा झाडे होती. २००७ मध्ये आलेल्या अतिवृष्टीमध्ये तलाव ओव्हरफ्लो होऊन तलावाखालच्या बाजूने पाझरल्याने या शेतामधील संपूर्ण संत्रा झाडे खराब होऊन शेती निरस झाली. तालुका कृषी अधिकारी मोर्शी यांच्या अहवालानुसार तसेच जिल्हाधिकारी यांनी २४ एप्रिल २०१० रोजी अप्पर मुख्य सचिवांना दिलेल्या पत्रानुसार ठवळी यांचे ७ लक्ष ९२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याने त्यांनी नुकसान भरपाई मिळण्यात यावी, असे कळविले आहे. तसेच अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याकारी अधिकारी यांनादेखील १२ मार्च २०१३ रोजी शासनास पत्र देऊन या शेतकऱ्यास नुकसान भरपाई देण्याचे कळविले आहे. परंतु शासनाने गेल्या आठ वर्षांपासून त्याकडे दुर्लक्ष केले.
एकनाथ ठवळी यांचा शेतीचाच व्यवसाय असल्याने शेती पिकाच्या उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. शेतीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई न मिळाल्याने त्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी तसेच शेतीच्या मशागतीसाठी त्यांनी कर्ज तसेच नातेवाईकांकडून उसनवारी घेऊन ते कर्जबाजारी झाले आहेत. याप्रकरणी ‘लोकमत’ने २१ जुलै रोजी वृत्त प्रकाशित करुन शासनाने लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. गेल्या आठ वर्षांपासून न्यायासाठी वणवण भटकत विविध शासकीय कार्यालये पालथे घालूनही अद्याप न्याय न मिळाल्याने अखेर त्यांनी आता लवकर न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)

Web Title: For eight years, the orange growers have to pay for the loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.