लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती/अकोला / चंद्रपूर :विदर्भात गणपती विसर्जनादरम्यान पाण्यात बुडून आठ जणांचा मृत्यू झाला. बाप्पाला मिरवणुकीने वाजत-गाजत निरोप देण्याच्या आनंदावर त्यामुळे विरजण पडले.
एकट्या अमरावती जिल्ह्यात तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. धामणगाव रेल्वे तालुक्यातील बगाजी सागर धरण व चांदूर बाजार तालुक्यातील देऊरवाडा येथील पूर्णा नदीच्या पात्रात दोन तरुण बुडाले. दर्यापुरातील चंद्रभागा नदीत बुडून महिलेचा मृत्यू झाला.
कुटुंबातील गणपती विसर्जनादरम्यान करण अमोल चव्हाण (२०, रा. वाघोली, ता. धामणगाव रेल्वे) या युवकाचा शनिवारी दुपारी अंघोळ करताना बगाजी सागर धरणात बुडून मृत्यू झाला. चांदूर बाजार तालुक्यातील देऊरवाडा येथील आदेश गंगाधर पंधरे (२७) हा युवक शनिवारी सायंकाळी ६ वाजता पूर्णा नदीच्या पात्रात वाहून गेला होता. ७ सप्टेंबरला सकाळी १० वाजता कोदोरी शिवारातील नदीपात्रात आदेशचा मृतदेह आढळून आला. दर्यापूर शहरात मुक्ता साहेबराव श्रीनाथ (३२, रा. बाराखोल्या) यांचा शनिवारी सायंकाळी ४च्या सुमारास चंद्रभागा नदीत पाय घसरल्याने बुडून मृत्यू झाला. धारणी तालुक्यातील धुळघाट गडगा येथील गडगा नदीपात्रात ६ सप्टेंबरला सायंकाळी कुसुमकोट बुजुर्ग येथील अनिल गणेश माकोडे (३०) हा वाहत गेला. त्याचा अद्याप मृतदेह हाती लागलेला नाही.
कार अपघातात एक ठार
रामचरण अकोला-पातूर मार्गावर मध्यरात्री कार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार अंधारे (रा. शिवसेना वसाहत, अकोला) यांचा जागीच मृत्यू झाला, तर राहुल खोंड, विनोद डांगे आणि विकी माळी हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्वांवर अकोल्यात उपचार सुरू आहेत. गणेश विसर्जन करून परतताना हा अपघात घडला.
युवकाचा बुडून मृत्यू
चंद्रपूरच्या दुर्गापूर पोलिस स्टेशन हद्दीत गणेश विसर्जन करताना १८ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला. ७ सप्टेंबर रोजी आपत्ती व्यवस्थापन व पोलिस कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम राबवीत युवकाचा मृतदेह बाहेर काढला. बेताल चौक दुर्गापूरमध्ये राहणारा १८ वर्षीय दीक्षांत राजू मोडक हा दुपारी अडीचच्या सुमारास भटाळी पुलावर इरई नदीच्या पात्रात मित्रासोबत दीक्षांत व एकाचा तोल गेला. त्याचवेळी दुसऱ्या युवकाला वाचविण्यास यश आले. मात्र, दीक्षांत बुडाल्याने तो पाण्याबाहेर आला नाही. रात्र झाल्याने पोलिसांनी शोधमोहीम थांबविली. ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास शोध पथकाला दीक्षांतचा मृतदेह आढळला. दुर्गापूर पोलिसांनी याप्रकरणी नोंद केली आहे.
तिघे बुडाले तर एकाचा अपघातात मृत्यू
- अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांत अनेक ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्या. यात बुडून तसेच अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून, काहीजण जखमी झाले आहेत.
- बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील वझर गावात पवन गणेश मोहिते (२१) या युवकाचा विसर्जनावेळी तलावात बुडून मृत्यू झाला. त्याच्यासोबत पाण्यात गेलेला रोशन मोहिते याला नागरिकांनी बाहेर काढून तातडीने उपचार दिल्याने त्याचा जीव वाचला. अन्य एका घटनेत वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील सेवादासनगर येथील मृत्युंजय राजेश राठोड (२३) हा युवक ७ सप्टेंबर रोजी सकाळी अरुणावती नदीत विसर्जनावेळी पाण्यात वाहून गेला. स्थानिकांनी शोधकार्य सुरू ठेवले असले तरी संध्याकाळपर्यंत प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
- तिसरी घटना अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यात घडली. नागझरीजवळील मन नदीत इमरान खान करीम खान (रा. भौरद) हा ५ सप्टेंबर रोजी विसर्जनासाठी उतरला असता वाहून गेला. त्याचा मृतदेह दोन दिवसांनी कवठा बंधाऱ्यात सापडला.