दरमहा एक प्रमाणे आठ केंद्र संमेलन घेण्याचे आदेश
By Admin | Updated: May 18, 2015 00:08 IST2015-05-18T00:08:20+5:302015-05-18T00:08:20+5:30
केंद्र संमेलन हा प्रशासनाचा महत्त्वाचा भाग आहे. यात केंद्रसंमेलनाद्वारे येत्या शैक्षणिक सत्रापासून सुसूत्रता आणण्याचा...

दरमहा एक प्रमाणे आठ केंद्र संमेलन घेण्याचे आदेश
नव्या शैक्षणिक अंमलबजावणी : शिक्षकांच्या सुटीवर संक्रांत
अमरावती : केंद्र संमेलन हा प्रशासनाचा महत्त्वाचा भाग आहे. यात केंद्रसंमेलनाद्वारे येत्या शैक्षणिक सत्रापासून सुसूत्रता आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयोग राज्य शासनाने हाती घेतला. त्याची अंमलबजावणी शनिवार ११ जुलै २०१५ पासून करण्यात येणार आहे. या धोरणानुसार शासनाने दुसरा व चौथा शनिवार निश्चित केला आहे. जुलैतील पहिले केेंद्र संमेलन दुसऱ्या शनिवारी घेण्याचे आदेश दिले आहेत. शनिवार दिवशी शाळेची वेळ ही अर्ध्या दिवसाची राहते. त्यामुळे यात बदल करुन हे केंद्र संमेलन दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी घेण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.
राज्यात २००२ पासून सर्व शिक्षा अभियान सुरु झाले. या अभियानाचा एक भाग म्हणून केंद्र संमेलन सुरु आहेत. मात्र आतापर्यंत केंद्र संमेलन घेणे केंद्र प्रमुखापुरतेच मर्यादित होते. त्यामुळे प्रत्येक केंद्रप्रमुख सोईनुसार केंद्रसंमेलन घ्यायचे. आतापर्यंत यात एकवाक्यता व सुसूत्रता आणण्याचा महत्त्वाचा बदल या वर्षापासून केला गेला. यापूर्वीचे केंद्रसंमेलन जेवणावळी व सत्कार समारंभासारख्या अनौपचारिक बाबींमुळे टीकेचा विषय झाला होता. केंद्र संमेलनात होणारा हा खर्चसुध्दा आयोजकांवर भुर्दंड पडता होता. मात्र आता नव्या सूचनानुसार केंद्र संमेलनातून जेवणावळी, सत्कार, निरोप समारंभ आदी कार्यक्रमांना फाटा देण्यात आला. शैक्षणिक वर्षात दरमहा एक याप्रमाणे ८ केंद्र संमेलन घ्यावयाची असून प्रत्येक केंद्र संमेलनाचे वेळापत्रक ठरवून देण्यात आलेले आहेत. परिपाठाने केंद्रसंमेलन सुरु करायचे असून त्यानंतर आदर्श पाठ व शैक्षणिक विषय ठरवून दिलेले आहेत. यात पुस्तकावर चर्चा घेण्याचा व त्यासाठी दर संमेलनात पुढील वेळी वाचून याच पुस्तकाची यादी पुरविण्यात आलेली आहे.
दुसरा व चौथा शनिवार हे पूर्ण सुटीचे दिवस असूनही या दिवशी अधिकारी वर्गालाही केंद्र संमेलनाचे सनियंत्रण करावे लागणार आहे. केंद्र संमेलन शनिवारऐवजी शुक्रवारी दुपारी २ ते ५ घेण्याची मागणी प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. शनिवार दिवशी सकाळपाळी शाळा असल्यामुळे सकाळपासूनच शिक्षकांना शाळेवर उपस्थित रहावे लागणार आहे. सायंकाळपर्यंत उपाशीपोटी केंद्रसंमेलनात मन कसे रमेल, याचा विचार शासनाने करावा किंवा या केंद्रसंमेलनाच्या दिवशी नास्त्याची व चहापाण्याची व्यवस्था प्रशासनाव्दारे करण्यात यावी. आयोजकांवर याचा कुठलाही भुर्दंड देण्यात येऊ नये. केंद्रसंमेलन केंद्र शाळेवरच घेण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष काळू बोरसे पाटील, राज्य सरचिटणीस उदय शिंदे, राज्य कार्याध्यक्ष विजय कोंबे, उपाध्यक्ष चंद्रकांत पुसतकर, राज्य प्रतिनिधी राजेश सावरकर, राज्य महिला प्रतिनिधी अलका देशमुख यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
केंद्र संमेलनास प्रशिक्षणाचा दर्जा
केंद्र संमेलनास आता प्रशिक्षणाचा दर्जा देण्यात आला असून प्राथमिक शिक्षकांना वर्षभरात पूर्ण करावयाच्या २० दिवसांत केंद्र संमेलनाचे ८ दिवस धरले जातील. त्यामुळेही केंद्र संमेलनास महत्त्व प्राप्त होणार आहे. यापूर्वी कार्यालयीन कामाच्या दिवशी केंद्र संमेलनाचे आयोजन केले जात होते. मात्र आता शनिवार या अर्ध्या सुटीच्या दिवशी केंद्र संमेलन घ्यावयाचे आहे. या दिवशी सकाळी २ तास दैनंदिन अध्यापन व शालेय पोषण आहाराची जबाबदारी पूर्ण करुन उर्वरित सकाळी ११.३० ते दुपारी ४.३० या वेळेत केंद्र संमेलन करावयाचे आहे. त्यामुळे शिक्षकांच्या सुटीवर संक्रांत आल्याची भावना शिक्षक समितीने व्यक्त केली.