गुरूकुलला शिक्षणाधिकाऱ्यांची नोटीस
By Admin | Updated: February 9, 2016 00:16 IST2016-02-09T00:16:45+5:302016-02-09T00:16:45+5:30
पालकांची दिशाभूल करणे, त्यांना अपमानास्पद वागणूक देणे यासह आदी कारणांची पालकांनी महिनाभरापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेण्यात आली.

गुरूकुलला शिक्षणाधिकाऱ्यांची नोटीस
पालकांच्या तक्रारीत तथ्य : मुख्याध्यापकांना नोटीस मिळाली नाही
अचलपूर : पालकांची दिशाभूल करणे, त्यांना अपमानास्पद वागणूक देणे यासह आदी कारणांची पालकांनी महिनाभरापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेण्यात आली. आपल्या शाळेची मान्यता रद्द का करू नये, अशा आशयाची नोटीस शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी येथील गुरुकुल पब्लिक स्कूल यांना बजावली आहे.
अचलपूर येथील रेल्वेगेटच्या जवळ वाघाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचालित गुरूकुल पब्लिक स्कूल येथे मागील महिन्यात बोलावलेल्या पालकसभेत संस्थाध्यक्ष रवींद्र गोळे यांनी पालकांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला होता. हा वाद चांगलाच उफाळला होता.
मागील महिन्यात संदीप वार्इंदेशकर, गजेंद्र वारके, सुधीर वानखडे, श्याम चौबे, नरेंद्र फिसके यांच्यासह आदी पालकांनी विदर्भ मिल कॉलनीतील एका बड्या नेत्याच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले होते. त्यात संस्थाध्यक्ष रवींद्र गोळे हे मनमानी कारभार करीत असून पालकांची दिशाभूल करून अपमानास्पद वागणूक देतात, यासह अनेक तक्रारींचे मुद्दे नमूद केले होते. शिक्षणसंस्थेसंदर्भात अनेक पालकांनी लेखी तक्रार जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारीची गंभीर दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांना याप्रकरणी चौकशी करून त्वरित अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. (शहर प्रतिनिधी)
शिक्षणाधिकाऱ्यांना इशारा
चौकशी पूर्ण झाल्यानंतर प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांनी पब्लिक स्कूलचे प्राचार्य सुधीर इंगळे व वाघाई शिक्षण संस्थाध्यक्ष रवींद्र गोळे यांना पत्र पाठविले. त्यात म्हटले आहे की, पालकांच्या तक्रारीत तथ्य आढळून आले असून सी. बी. एस. ई. बोर्डाची परवानगी दिशाभूल करणे, शासन निर्णयानुसार पालक समितीचे गठन न करणे, नियमबाह्य फी पालकांकडून वसूल करणे आदीबाबत अनियमितता आढळून येत आहे. या प्रकरणात संस्थाध्यक्ष व मुख्याध्यापक जबाबदार दिसत असून शाळेची मान्यता रद्द का करू नये, याचा ३० दिवसांच्या आत खुलासा करावा, असेही पत्रात म्हटले आहे.