शिक्षणाधिकाऱ्यांना सुचले उशिराचे शहाणपण !
By Admin | Updated: June 27, 2016 00:04 IST2016-06-27T00:04:42+5:302016-06-27T00:04:42+5:30
शहर तथा जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्यानंतर आणि प्रवेश प्रक्रिया आटोपल्यानंतर ‘टिसी रिलिज करा’ अशा सूचना मनपा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

शिक्षणाधिकाऱ्यांना सुचले उशिराचे शहाणपण !
सूचना : टीसी रिलीज करा
अमरावती : शहर तथा जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्यानंतर आणि प्रवेश प्रक्रिया आटोपल्यानंतर ‘टिसी रिलिज करा’ अशा सूचना मनपा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. शिक्षणाधिकारी गुल्हाने यांच्या या पवित्र्यावर शहरातील अनेक मुख्याध्यापकांनी उशिराने सुचलेले शहाणपण, अशी बोचरी प्रतिक्रिया दिली आहे.
विजय गुल्हाने यांनी मनपाच्या शाळा मुख्याध्यापकांचे टिसी देण्याचे अधिकार गोठविले होते. आपल्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही पाल्य व पालकाला टिसी (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र) देण्यात येऊ नये, असे फर्मान त्यांनी सोडले होते. त्यावर मुख्याध्यापक संघाचे एन. टी. अर्डक व अन्य शिक्षक, मुख्याध्यापकांनी जोरदार आक्षेप घेतला होता. तथा गुल्हाने यांनी सोडलेले फर्मान आरटीई कायद्यातील तरतुदीचा भंग असल्याचे म्हटले होते. आरटीई कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही विद्यार्थ्याची टिसी रोखता येत नाही. तथापि मनपा शाळेची पटसंख्या स्थिर ठेवण्यासाठी टिसी न देण्याच्या सूचना आपण मुख्याध्यापकांना केल्या आहेत, असे लंगडे समर्थन गुल्हाने यांनी केले होते. महापौर रिना नंदा यांनीसुद्धा शिक्षणाधिकारी गुल्हाने यांना कुणाचीही टिसी न रोखण्याचे निर्देश दिले होते. गुल्हानेंनी महापौरांचे आदेशही मानले नाहीत. आता त्यात शाळा सुरू झाल्यानंतर टिसी देण्याच्या सूचनेची भर पडली आहे. (प्रतिनिधी)
काय म्हणतात गुल्हाने?
टीसी देण्याचे स्थगित केलेले अधिकार पुन्हा प्रदान करण्यात येत आहेत. पालकांच्या विनंतीवरून तत्काळ टीसी द्यावी, ईओच्या परवानगीची गरज नाही, अशा सूचना गुल्हाने यांनी मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.
ऐनवेळी प्रवेश कुठे घ्यायचे ?
शहरातील शाळा २७ जूनपासून सुरू होत आहेत. बहुतेक शाळांमधील प्रवेश प्रक्रियाही आटोपली आहे. त्यामुळे गुल्हानेंच्या सूचनेनुसार आता विद्यार्थ्यांना टीसी मिळाल्यात, तरीही त्यांचा प्रवेश अन्य शाळेत होणे नाही. गुल्हानेंच्या हटयोगामुळे अनेक पाल्यांचे शैक्षणिक भविष्यही धोक्यात आले आहे.