The economic upheaval in Magarrohio | मग्रारोहयोमध्ये आर्थिक अपहार

मग्रारोहयोमध्ये आर्थिक अपहार

ठळक मुद्देधारणी पंचायत समिती : २ ते ३ कोटींच्या कामांबाबत मंत्रालयापर्यंत तक्रारी, देयके थांबविली

लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात आलेल्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत सुमारे २ ते ३ कोटी रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याच्या तक्रारी मंत्रालयातपर्यंत करण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने ती देयके थांबविण्यात आली असली तरी पैकी काही कंत्राटदार राजकीय दबावतंत्राचा वापर करुन देयक काढत असल्याची माहिती हाती आली आहे.
धारणी तालुक्यात दोन-तीन वर्षांपासून ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनत अकुशल कामे केल्यानंतरच कुशल कामे करण्याचे प्रावधान असताना अकुशल कामे न करता थेट कुशल कामे करून त्या कामाची देयके काढण्याची धडपड सुरू झाली आहे. दोन ते तीन कोटी रुपयांचा हा घोटाळा झाल्याची तक्रार विविध संघटना आणि आमदारांनी केल्यामुळे देयके थांबविण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार नाशिक येथून सूत्रे हलवून देयके काढण्याचा प्रयत्न करीत आहे. यापैकी काही देयके काढल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
ग्रामीण भागातील नागरिकांना उपजिविका चालविण्यासाठी पाच किलोमीटर परिसरात कामे उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. याअंतर्गत धारणी पंचायत समितीने शेतरस्त्यांची जाळे ग्रामपंचायत यंत्रणेमार्फत विणले आहे. असे करीत असताना अकुशल कामे झालेल्या कामावरच कुशल कामे करण्याचे साधारण नियम असताना हेतुपुरस्सर बगल देऊन ग्रामसेवक, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांनी चिरीमिरी देऊन कोट्यवधी रुपयांची कुशल कामे मंजूर करून घेतले.
कुशल कामात अनियमितता झाल्याच्या तक्रारीमुळे दोन वर्षांपासून देयके थांबविण्यात आली होती. मात्र, आता ही देयके काढण्यासाठीची हालचाल तीव्र झाली आहे. अकुशल कामे न करता कुशल कामे करण्यात आलेल्या अनेक कामांची तक्रार जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना देण्यात आली होती. त्यानंतरही स्थानिक अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन देयके काढण्यात येत आहेत, अशी माहिती आहे.

स्थानिक अधिकाऱ्यांचे हात ओले ?
या कामामध्ये कोट्यवधींची देयके बोगस बिले दाखल करून काढण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले असतानाही देयकांची रक्कम कोणत्या नियमानुसार दिली, असा सवाल ग्रामीण स्तरांमधील जनता विचारत आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

धारणी तालुक्यात ४८ ग्रामपंचायतींमध्ये एकूण ५५ कामे झालेली आहेत. पैकी फक्त राजपूर ग्रामपंचायतीची देयके काढण्यात आली असून इतर कामे चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यामुळे या कामांचे देयकाबाबत अंतिम निर्णय मनरेगाचे आयुक्त घेतील.
- संजय काळे,
गटविकास अधिकारी

Web Title: The economic upheaval in Magarrohio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.