आर्थिक घोटाळ्यांना गणेश अणे यांचे बळ !

By Admin | Updated: December 29, 2014 00:49 IST2014-12-29T00:49:43+5:302014-12-29T00:49:43+5:30

पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत निरीक्षकपदी कार्यरत असलेले गणेश अणे यांनी श्री सुर्या, वासनकर ग्रुप आणि राणा लँडमार्क असल्या फसवणूककर्त्यांना बळ दिले.

Economic scams Ganesh! | आर्थिक घोटाळ्यांना गणेश अणे यांचे बळ !

आर्थिक घोटाळ्यांना गणेश अणे यांचे बळ !

अमरावती : पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत निरीक्षकपदी कार्यरत असलेले गणेश अणे यांनी श्री सुर्या, वासनकर ग्रुप आणि राणा लँडमार्क असल्या फसवणूककर्त्यांना बळ दिले. त्यापोटी बक्कळ कमाई केली. सामान्य जनतेची त्यामुळे लूट होत राहिली, अशी तक्रार युवा सेनेने गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे केली.
अणे यांच्या कारभारावर प्रकाश टाकणाऱ्या तीन पानांच्या लांबलचक तक्रारीअंती त्यांच्या खातेनिहाय आणि चलअचल संपत्तीची चौकशी तसेच आर्थिक गुन्हे शाखेतून तात्काळ बदलीची मागणी करण्यात आली आहे. सत्तेत सहभागी असलेल्या पक्षाच्याच एका शाखेने ही गंभीर तक्रार केल्यामुळे मुद्दा चर्चेचा ठरला आहे.
अणे यांना शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चौथे वर्ष सुरू आहे. नांदगावपेठ ठाण्याच्या हद्दीत ठाणेदार असताना त्यांनी 'सोफिया'च्या अतिभारीत ट्रकना राजरोस वाहतूक खुली केली होती. नांदगावपेठ पोलीस ठाण्याच्या कारकिर्दीतच त्यांनी 'बिझीलँड'शी संबंधित एका प्रकरणात आर्थिक घोळ केला होता. त्यामुळेच तत्कालिन पोलीस आयुक्तांनी त्यांचे स्थानांतरण 'कंट्रोल रूम'ला केले होते. त्यानंतर अणे यांनी स्वत:हून शासनाला बदली मागितली होती. त्यानुसार एटीएसला त्यांची बदलीदेखील झाली होती. पुढे या बदलीला स्थगिती देण्यात आली. अणे यांची थेट आर्थिक गुन्हे शाखेत नेमणूक करण्यात आली.
अणे यांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यकाळात श्री सुर्या ग्रुप, वासनकर समूह, राणा लँडमार्क यासारखे अनेक आर्थिक घोटाळे उघडकीस आले आहेत. या प्रकरणात अणे यांनी निष्पक्ष चौकशी न करता घोटाळेबाजांची, आरोपींची पाठराखण केली. सामान्यांचा पैसा लुटणाऱ्या गुन्हेगारांना अभय दिले. चंद्रशेखर राणा हा फसवणूक प्रकरणातील एक आरोपी वर्ष उलटूनही फरार आहे. आर्थिक प्रकरणात फसवणूक झाल्याची तक्रार देण्यास गेलेल्यांना अणे हे तक्रार न देण्यासाठी प्रवृत्त करतात. गैरअर्जदारांना फोन करून प्रेमळ भाषेतून तक्रार न देण्याविषयी मन वळवितात. २३ डिसेंबर रोजीचा विद्यार्थ्यांचा एका प्रकरणातील याविषयीचा अनुभव ताजा आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी अणे हे असल्याने फसवणूक करणाऱ्यांचे मनसुबे बळावले आहेत. त्यांची त्या पदावरून तातडीने बदली करण्यात यावी. आम्ही केलेल्या सर्व गंभीर आरोपांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी युवा सेनेने गृहराज्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. बऱ्याच प्रकरणांत वादग्रस्त ठरलेल्या अणे यांच्यासंबंधाने गृहखाते काय निर्णय घेते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Economic scams Ganesh!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.