ई-पीक पाहणी आता 'मोबाईल अ‍ॅप'वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 05:00 AM2020-07-11T05:00:00+5:302020-07-11T05:00:05+5:30

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असणाऱ्या सातबारावर त्यांनी पेरलेल्या पिकांच्या नोंद असणे आवश्यक असते. त्याअनुषंगाने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पीक पाहणी जलद, वस्तुनिष्ठ व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने शासनाने सदर मोबाईल अ‍ॅपवर नोंदी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अमरावती विभागातून अचलपूर तालुक्याची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आलेली आहे.

E-Peak Surveys now on 'Mobile App' | ई-पीक पाहणी आता 'मोबाईल अ‍ॅप'वर

ई-पीक पाहणी आता 'मोबाईल अ‍ॅप'वर

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या हिताचा उपक्रम : कृषी विभागाकडून माहिती 'अपलोड' करण्याचे आवाहन

अचलपूर/परतवाडा : शेतकऱ्यांनी स्वत: आपल्या पिकाची नोंद आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करण्यासाठी शासनाने टाटा ट्रस्टच्या सहयोगाने 'ई पीक पाहणी' हे मोबाईलवरील अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपचा वापर करून शेतकरी स्वत: आपल्या शेतातील पिकांची नोंद सातबारावर करू शकणार आहेत.
शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असणाऱ्या सातबारावर त्यांनी पेरलेल्या पिकांच्या नोंद असणे आवश्यक असते. त्याअनुषंगाने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पीक पाहणी जलद, वस्तुनिष्ठ व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने शासनाने सदर मोबाईल अ‍ॅपवर नोंदी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अमरावती विभागातून अचलपूर तालुक्याची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आलेली आहे. यात वेळोवेळी प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे माजी मुख्य सचिव जयंत बाठिया, माजी सनदी अधिकारी नरेंद्र कवडे, संभाजी कडू पाटील, तांत्रिक सल्लागार रामदास जगताप व त्यांची संपूर्ण टीम कार्यरत आहे. हा प्रकल्प अचलपूर तालुक्यात यशस्वी व्हावा यासाठी विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपायुक्त गजेंद्र बावणे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, उपजिल्हाधिकारी स्नेहल कणीचे, उपविभागीय कृषी अधिकारी देशमुख हे सर्व मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तलाठी, कोतवाल, कृषी सहायक, पोलीस पाटील यांना प्रशिक्षण देऊन त्यांना प्रोत्साहित करत आहेत.

अ‍ॅप शेतकऱ्यांसाठी किती फायद्याचे?
या माहितीचा उपयोग आधारभूत शासकीय खरेदी केंद्रावर शेतीमाल विक्री करणे, पीककर्ज, पीकविमा, कर्जमाफी, नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप करणे, न्यायालयीन प्रकरणे यामध्ये होणार आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामात अचलपूर तालुक्यातील २३,८०८ शेतकऱ्यांनी या अ‍ॅपद्वारे आपली नोंदणी केली. तालुक्यातील हिवरा, दोनोडा, येसुर्णा, येलकी, रायपुरा, भिलोना, वडगाव खु। या गावांत ई-पीक पाहणी अ‍ॅपद्वारे उल्लेखनीय काम झालेले आहे. १५ जुलैपासून खरीप हंगामातील संपूर्ण पीक पाहणी सदर अ‍ॅपच्या माध्यमातून केली जाईल.
अ‍ॅपवरील माहिती मराठी भाषेत उपलब्ध
सर्व शेतकऱ्यांना मोबाईलवर प्ले स्टोअरमधून हे अ‍ॅप सहज घेता येते. या अ‍ॅपमध्ये सर्वांना समजेल अशा मराठी भाषेत सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. या अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकरी आपल्या पिकाची नोंद घेऊ शकतो. पिकाचा फोटो काढून तो अ‍ॅपवर 'अपलोड' करू शकतो. शेतकऱ्यांनी पिकाची नोंद करताच ही माहिती तलाठी त्यांच्या 'लॉग इन'वर उपलब्ध होणार आहे. त्याला तलाठ्यांनी मान्यता देताच त्या नोंदीचा अंमल शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर तात्काळ होते. ई-पीक पाहणी अ‍ॅपवरून शेतकऱ्यांनी पिकाची नोंद केल्यास अचूक होईल.

जे शेतकरी मोबाईलच्या माध्यमातून स्वत: ई-पीक पाहणी करणार नाहीत, त्यांच्या पिकाची नोंद सातबारावर होणार नाही. त्यामुळे त्यांना पीककर्जासह कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यास अडचणी येतील. सदर अ‍ॅपद्वारे पिकाची नोंद करावी.
- मदन जाधव,
तहसीलदार, अचलपूर

Web Title: E-Peak Surveys now on 'Mobile App'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.