ई-वन वाघीण, मृत शोभाराम आणि राजकारण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 06:00 IST2019-09-04T06:00:00+5:302019-09-04T06:00:41+5:30
ब्रह्मपुरी येथील जंगलातून दोन महिन्यांपुर्वी मेळघाटातील डोलार जंगलात आणलेल्या या वाघिणीच्या दहशतीखाली ४० खेडी जगत होती. कधी लहान बालकास, कधी शेळी, गुरेढोरे यांच्यावर हल्ले करता-करता शुक्रवारी वाघिणीने चक्क मनुष्यवधाचा गुन्हा केला .

ई-वन वाघीण, मृत शोभाराम आणि राजकारण !
श्यामकांत पाण्डेय ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : मेळघाटातील राजकीय वातावरण सध्या इ-वन वाघिणीच्या हल्ल्यात ठार झालेल्या शोभाराम चव्हाण यांच्या मृत्यूने चांगलेच तापले आहे. मृताच्या परिजनांना राजकारण्यांनी काय दिले, हे गेल्या तीन दिवसांत कळेनासे झाले आहे. तरीसुद्धा जे काही करण्यात आले, ते केवळ आमच्या म्हणण्यानुसार झाले, याचे श्रेय घेण्यावरून राजकीय पुढाऱ्यांचे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दादरा येथील शोभाराम कालुसिंग चव्हाण हा ३० आॅगस्टच्या रात्री सवंगड्यांसह शेतातील कामे आटोपून रात्री ८ वाजता आपल्या घराकडे निघाला होता. मात्र, ही रात्र त्याच्यासाठी शेवटची रात्र ठरणार, याची कल्पनाही त्याला नव्हती. काही अंतरावर असलेले गाव डोळ्यांसमोर दिसत असतानाच रस्त्याच्या बाजूने ई-वन वाघिणीने शोभारामवर हल्ला केला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या दिलीप सरदार चव्हाण यालासुद्धा वाघिणीने गंभीर जखमी केले. मानव आणि प्राणी यांच्या या युद्धात शोभारामला जीव गमवावा लागला आणि दिलीप चव्हाण हा अमरावती येथील रुग्णालयात उपचार घेत आहे.
ब्रह्मपुरी येथील जंगलातून दोन महिन्यांपुर्वी मेळघाटातील डोलार जंगलात आणलेल्या या वाघिणीच्या दहशतीखाली ४० खेडी जगत होती. कधी लहान बालकास, कधी शेळी, गुरेढोरे यांच्यावर हल्ले करता-करता शुक्रवारी वाघिणीने चक्क मनुष्यवधाचा गुन्हा केला . ही वाघीण मेळघाटातील जंगलातून बाहेर निघावी, यासाठी माजी आमदार राजकुमार पटेल यांनी शासनाला सात दिवसाची अल्टिमेटम देताच प्रशासन जागे झाले. परंतु, तोपर्यंत फार उशीर झाला होता. वनविभागाला अशा घटनेची प्रतीक्षाच होती, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. शोभाराम चव्हाण यांच्या मृत्यूनंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर, माजी आमदार केवलराम काळे आणि राजकुमार पटेल यांच्यासह युवक काँग्रेसचे पंकज मोरे यांनी मृताच्या कुटुंबाला भेट देऊन जणू आपणच त्यांचे खरे पालक आहोत, या तºहेने ते प्रसिद्धी माध्यमांसमोर आले.
राजकारणाला रंगत
अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणुकीची निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण किती मोठ्या प्रमाणात सक्रिय आहोत, हे दाखविण्यासाठी वाघिणीच्या प्रकरणात आपले अस्तित्व सर्व राजकीय नेत्यांनी आपापल्या परीने दाखविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. खºया अर्थाने मेळघाटातील राजकारणाला रंगत चढली.
उशिराचे शहाणपण
ई-वन वाघीण, मृत शोभाराम आणि राजकारण याची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा गाजत आहे. या प्रकरणात आपणच सर्वात मोठी भूमिका बजावली, याचे श्रेय घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मानवाचा जीव राजकारणापेक्षा मोठा नाही, हे कधी उमगेल ?